येरळवाडी तलावात १० लाख मत्स्यबीज
By Admin | Updated: November 9, 2014 23:35 IST2014-11-09T21:58:30+5:302014-11-09T23:35:45+5:30
‘वेदावती’ संस्थेचा पुढाकार : धरणग्रस्तांना रोजगाराची संधी

येरळवाडी तलावात १० लाख मत्स्यबीज
वडूज : येरळवाडी, ता. खटाव येथील वेदावती धरणग्रस्तांची सहकारी मच्छीमार संस्थेच्यावतीने येरळवाडी मध्यम प्रकल्पात तब्बल दहा लाख मत्स्यबीज सोडण्यात आले.
वेदावती मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष एम. एस. गोडसे यांच्या हस्ते व सरपंच सदाशिव बागल, सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब पोळ, तंटामुक्तीचे अध्यक्ष भाऊसाहेब बागल, जावेद मनोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे मत्सबीज सोडण्यात आले.
गोडसे म्हणाले, येरळवाडी प्रकल्पातून विस्थापित झालेल्या लोकांना प्रकल्पाच्या माध्यमातून उदर निर्वाहाचे साधन निर्माण व्हावे, त्यादृष्टीने प्रकल्पातील मच्छीमारीचा ठेका या लोकांना प्राधान्याने द्यावा, असा शासनाचाच आदेश आहे. संस्थेच्या कामकाजात श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सहसचिव तानाजीराव मांडवे यांचे चांगले सहकार्य लाभले. सद्य:स्थितीत तलावातील पाणीपातळी चांगली असल्याने संस्थेच्यावतीने तलावात दहा लाख मत्स्यबीज सोडण्यात आले आहेत. आगामी काळात त्यामध्ये निश्चितच चांगली वाढ होईल. त्यामुळे प्रकल्पातील विस्थापित भूमीहीन, शेतमजूर, धरणग्रस्त लोकांना रोजगार निर्मितीसाठी फायदा होईल.
सरपंच बागल म्हणाले, ‘तलावात मत्स्यबीज सोडल्यामुळे धरणग्रस्त लोकांना रोजगाराची चांगली संधी उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. संस्थेस सर्वतोपरी सहकार्य राहील.
यावेळी दत्तात्रय पाटोळे, बळवंतराव पाटील, लखन जाधव, सयाजी जाधव, उमाजी जाधव, प्रकाश बागल, अजित दुबळे, सुरेश चव्हाण, आनंदा कमाने, रमेश जाधव, चंद्रकांत दुबळे, सुरज जाधव उपस्थित होते. मधुकर बागल यांनी स्वागत केले. सोमनाथ बागल यांनी आभार
मानले. (प्रतिनिधी)
येरळवाडी, ता. खटाव येथील मध्यम प्रकल्पात वेदावती धरणग्रस्तांची सहकारी मच्छीमार संस्थेच्यावतीने मत्स्यबीज सोडताना एम. एस. गोडसे, सदाशिव बागल, भाऊसाहेब बागल, बाळासाहेब बागल आदी.