झेडपी अध्यक्ष पदासाठी नेत्यांना साकडे

By Admin | Updated: August 29, 2014 23:13 IST2014-08-29T23:04:44+5:302014-08-29T23:13:44+5:30

जगताप गटाची गोची : उपाध्यक्षपद वाळव्याला जाण्याची शक्यता

ZP president heads for the post | झेडपी अध्यक्ष पदासाठी नेत्यांना साकडे

झेडपी अध्यक्ष पदासाठी नेत्यांना साकडे

सांगली : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडी २१ सप्टेंबर रोजी होणार आहेत. अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कल्पना सावंत (सावळज), मनीषा पाटील (आटपाडी), वैशाली नाईक (शिराळा), योजना शिंदे (मणेराजुरी), स्नेहल पाटील (येळावी) अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. या इच्छुकांनी अध्यक्षपदाची आपल्यालाच संधी मिळण्यासाठी नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे. उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत सध्या तरी लिंबाजी पाटील (तांबवे, ता. वाळवा) या एकमेव आहेत. या पदाधिकारी निवडीत विलासराव जगताप समर्थक सदस्यांची गोची होण्याची शक्यता असून त्यांच्याविरोधात बंड पुकारणाऱ्यांनाच संधी मिळण्याची शक्यता
आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी निवडी मुदतीतच होणार की मुदतवाढ मिळणार याबाबत तर्क-वितर्क लढवले जात होते. त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच पंचायत समिती सभापती, उपसभापतींच्या निवडीच्या तारखा शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना कळवल्या आहेत. पंचायत समितींच्या सभापती, उपसभापतींच्या निवडी १४ रोजी होणार आहेत.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्षांचा कार्यकाल २० सप्टेंबरला संपत असून, २१ रोजी नवीन निवडी होणार आहेत. जिल्ह्यातील बदल्या राजकीय परिस्थितीत जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे ९ सदस्य त्यांच्या नेत्यांसोबत भाजप—शिवसेनेच्या संपर्कात आहेत. मात्र केंद्र शासनाच्या पक्षातर बंदी कायद्यातील दुरुस्तीमुळे त्यांना सदस्यत्वाचा राजीनामा देऊनच बाहेर पडावे लागणार आहे.  परंतु, एवढे धाडस सदस्य निश्चित दाखविणार नाहीत. यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीत राष्ट्रवादीच बाजी मारण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या कल्पना सावंत, मनीषा पाटील, वैशाली नाईक, योजना शिंदे, स्नेहल पाटील इच्छुक आहेत. सावंत, पाटील, नाईक प्रबळ दावेदार आहेत. (वार्ताहर)

Web Title: ZP president heads for the post