झेडपी पदाधिकाऱ्यांचे डिसेंबरला राजीनामे
By Admin | Updated: November 28, 2015 00:17 IST2015-11-27T23:49:11+5:302015-11-28T00:17:19+5:30
जयंतरावांची सूचना : कारभारावरही नाराजी

झेडपी पदाधिकाऱ्यांचे डिसेंबरला राजीनामे
सांगली : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह चार सभापतींना दि. १ डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे नेते माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी राजीनामा देण्याची सूचना दिल्याची खात्रीशीर माहिती आहे.जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे स्पष्ट बहुमत असल्यामुळे पूर्ण त्यांची सत्ता आहे. पदाधिकारी निवडतानाच सव्वा वर्षाचा कार्यकाल ठरवून दिला होता. विद्यमान पदाधिकाऱ्यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाल संपत आल्यामुळे आणि कारभारही सुमार दर्जाचा झाला आहे, म्हणून अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती मनीषा पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती पपाली कचरे, समाजकल्याण समिती सभापती उज्ज्वला लांडगे यांना दि. १ डिसेंबर रोजी राजीनामा देण्याची सूचना जयंत पाटील यांनी दिल्याचे समजते. या प्रकरणाला काही पदाधिकाऱ्यांनीही दुजारा दिला आहे.
दरम्यान, विद्यमान पदाधिकाऱ्यांपैकी काहींचा कारभार चांगला असल्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. परंतु, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी, सर्वच पदाधिकाऱ्यांना बदलणार असल्याचे सांगितले आहे. (प्रतिनिधी)