झेडपी पदाधिकारी बदलाचा चेंडू चंद्रकांतदादांच्या कोर्टात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:29 IST2021-02-09T04:29:24+5:302021-02-09T04:29:24+5:30
सांगली : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांचा वर्षभराचा कार्यकाल संपल्यामुळे इच्छुकांनी भाजपच्या नेत्यांकडे या पदांसाठी फिल्डींग लावली आहे. भाजपचे ...

झेडपी पदाधिकारी बदलाचा चेंडू चंद्रकांतदादांच्या कोर्टात
सांगली : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांचा वर्षभराचा कार्यकाल संपल्यामुळे इच्छुकांनी भाजपच्या नेत्यांकडे या पदांसाठी फिल्डींग लावली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रत्येक तालुक्यातील नेत्यांशी चर्चा करून पदाधिकारी बदलाबाबतचा निर्णय घेणार आहेत. पाटील हे १३ किंवा १५ फेब्रुवारीला सांगलीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेणार आहेत. त्यानंतरच यावर निर्णय होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे, शिक्षण व अर्थ समिती सभापती आशाताई पाटील, महिला व बालकल्याण सभापती सुनीता पवार, बांधकाम व अर्थ समिती सभापती जगन्नाथ माळी यांचा एक वर्षाचा कार्यकाल दिनांक २ जानेवारी रोजी संपला आहे. मागील पदाधिकारी निवडीवेळी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत विद्यमान पदाधिकाऱ्यांना वर्षभराचा कालावधी देऊन उर्वरित वर्षाच्या कालावधीसाठी नाराज सदस्यांना संधी देण्याचा निर्णय झाला होता. परंतु, कोरोनामध्येच सर्व कालावधी गेल्यामुळे या पदाधिकाऱ्यांना काम करण्याची संधीच मिळाली नाही. यामुळे पुढील कालावधीतही आपल्यालाच कायम ठेवण्याची मागणी विद्यमान पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
दुसऱ्या बाजूला इच्छुकांनी आग्रह कायम ठेवला असून, ठरल्यानुसार संधी देण्याची भूमिका नेत्यांकडे मांडली आहे. पदाधिकारी बदलासाठी सुरेंद्र वाळवेकर, नितीन नवले, सरदार पाटील, अरुण बालटे, सरिता कोरबू यांनी फिल्डींग लावली आहे. या सदस्यांचे म्हणणे भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचवले आहे. पाटील हे सांगलीत दिनांक १३ अथवा १५ फेब्रुवारीला येऊन भाजप कोअर कमिटीची बैठक घेणार आहेत. त्यामुळे पदाधिकारी बदलाचा चेंडू सध्या चंद्रकांतदादांच्या कोर्टात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
चौकट
सदस्य फुटण्याची भीती
वर्षापूर्वीच्या पदाधिकारी बदलावेळी भाजपचे काही सदस्य राष्ट्रवादीच्या गळाला लागण्याची शक्यता होती. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य गळाला लावला होता. भाजपचे चार सदस्य हाती न लागल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाधिकारी बदलामध्ये फारसे लक्ष घातले नव्हते. परंतु, यावेळी पुन्हा तसेच होईल, असे नाही. जयंत पाटील यांनी मनावर घेतले तर शिवसेनेचे तीन, माजी मंत्री अजितराव घोरपडे समर्थक दोन आणि भाजपचे नाराज सदस्य राष्ट्रवादीकडे गेले, तर सत्तांतर होऊ शकते. त्यामुळे भाजप सध्या ताकही फुंकून पिण्याच्या तयारीत आहे.