जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रुजू न होताच परतले!
By Admin | Updated: June 19, 2014 00:57 IST2014-06-19T00:55:10+5:302014-06-19T00:57:31+5:30
बदलीच्या हालचाली : अन्य अधिकाऱ्यांची ‘फिल्डिंग’

जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रुजू न होताच परतले!
सांगली : उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर साताऱ्याहून सांगली जिल्हा परिषदेत रुजू होण्यासाठी आले, पण पदभार न स्वीकारताच परत गेल्याने कर्मचाऱ्यांमध्ये उलट-सुलट चर्चा रंगल्या होत्या़ ते बदली रद्द करण्याच्या प्रयत्नात असून, त्यांना तसा हिरवा कंदील मिळाला आहे़ यामुळे त्यांच्या जागेवर येण्यासाठी रमेश जोशी (शिरोळ) आणि रविकांत आडसूळ (पलूस) या दोन अधिकाऱ्यांचे प्रयत्न चालू आहेत़
सातारा जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभागाकडील उपमुख्य कार्यकारी अधिकारी मस्कर यांची महिन्यापूर्वी सांगली जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे बदली झाली होती़ ते आज-उद्या रूजू होईल, असा अंदाज पदाधिकारी बांधून होते़ या कालावधित त्यांचे मंत्रालय पातळीवर बदली रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू होते़ सोमवारी त्यांना मंत्रालयातून बदली रद्दसाठी हिरवा कंदील मिळताच मंगळवारी येथे दाखल झाले, पण ते पदभार स्वीकारण्यासाठी आले नव्हते, तर कागदपत्रांची तांत्रिक पूर्तता करण्यासाठी आले होते़ यामुळे ते पदभार न स्वीकारताच परत गेले. याची पदाधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये जोरात चर्चा रंगली होती़
दरम्यान, मस्कर हजर न झाल्याचे त्यांच्या अन्य सहकाऱ्यांच्या पथ्यावर पडले आहे़ शिरोळ पंचायत समितीकडे गटविकास अधिकारी असलेले रमेश जोशी आणि पलूस पंचायत समितीकडील रविकांत आडसूळ यांनी मस्कर यांच्या जागेवर येण्यासाठी फिल्डिंग लावली आहे़ या दोन्हीपैकी एका अधिकारी मस्कर यांच्या जागेवर येण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)