जिल्हा परिषदेत आबांचे तैलचित्र लावणार
By Admin | Updated: February 25, 2015 00:03 IST2015-02-24T23:03:40+5:302015-02-25T00:03:27+5:30
आदरांजली सभा : सदस्यांनी घेतला निर्णय

जिल्हा परिषदेत आबांचे तैलचित्र लावणार
सांगली : जिल्हा परिषदेच्या वसंतदादा पाटील सभागृहात माजी गृहमंत्री आऱ आऱ पाटील (आबा) यांचे तैलचित्र लावण्याचा निर्णय पदाधिकारी आणि सदस्यांनी आज, मंगळवारी आदरांजली सभेत घेतला़ आबांचे तैलचित्र युवा लोकप्रतिनिधींसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मतही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले़ यावेळी अनेक सदस्यांनी आबांच्या आठवणींना उजाळा दिला़
आऱ आऱ पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉ़ गोविंदराव पानसरे यांना आदरांजली वाहण्यासाठी जिल्हा परिषदेत आज सभा घेण्यात आली़ यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, बांधकाम व आरोग्य सभापती गजानन कोठावळे, समाजकल्याण सभापती उज्ज्वला लांडगे, महिला व बालकल्याण सभापती पपाली कचरे, माजी अध्यक्ष देवराज पाटील, सदस्य भीमराव माने, वाळवा पंचायत समितीचे सभापती रवींद्र बर्डे, कवठेमहांकाळ पंचायत समितीच्या सभापती वैशाली पाटील आदी उपस्थित होते़ जिल्हा परिषदेच्या याच सभागृहातून आबांच्या राजकारणाची सुरुवात झाली़ पुढे ते राज्याच्या राजकारणात काम करीत उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. आबांचा हा राजकीय प्रवास युवा पिढीला आदर्श ठरणारा असल्यामुळे त्यांची आठवण म्हणून त्यांचे तैलचित्र सभागृहात असावे, असे मत सदस्यांनी व्यक्त केले़ यावेळी सर्वच सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी आबांचे तैलचित्र सभागृहात लावण्यास मंजुरी दिली़ (प्रतिनिधी)