स्वीय निधीसाठी जिल्हा परिषद सदस्यांची सीईओकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:29 IST2021-09-18T04:29:31+5:302021-09-18T04:29:31+5:30

सांगली : जिल्हा परिषद स्वीय निधी वाटपबाबत सर्वपक्षीय सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांची भेट घेत स्वीय निधी ...

Zilla Parishad members rush to CEO for self-funding | स्वीय निधीसाठी जिल्हा परिषद सदस्यांची सीईओकडे धाव

स्वीय निधीसाठी जिल्हा परिषद सदस्यांची सीईओकडे धाव

सांगली : जिल्हा परिषद स्वीय निधी वाटपबाबत सर्वपक्षीय सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांची भेट घेत स्वीय निधी वाटपामध्ये असलेला दुजाभाव दूर करण्याची मागणी केली. स्वीय निधी वाटप सदस्यांच्या संमतीने झालेले नाही. त्यामुळे हा विषय प्रलंबित ठेवण्याची मागणी केली. यावर डूडी यांनी अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन दिले.

राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद शरद लाड, अर्जुन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय सदस्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डूडी यांची भेट घेऊन स्वीय निधीबाबत तक्रार केली. जिल्हा परिषदेचा आठ कोटींचा निधी सदस्यांना विकास कामांसाठी देण्यात येणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभासपतींना थोडे झुकते माप देत हा निधी सर्व सदस्यांमध्ये समान वाटपाची परंपरा आहे. यावेळी मात्र या निधीवरून वाद निर्माण झाला आहे. सदस्यांना विश्वासात न घेता, बांधकाम समिती अथवा संबधित समितीत कोणतीही चर्चा न करता हा निधी खर्चाचा प्रयत्न सुरू आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी परस्परच या निधीचे वाटप केले आहे. अध्यक्षांनी ६० लाखांची, उपाध्यक्षांनी ५० लाखांची तर चार सभापतींनी प्रत्येकी ४५ लाखांची कामे सुचवली आहेत. संबंधित कामांचे प्रस्तावही तयार केले आहेत. प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करणार आहेत, असा आरोप राष्ट्रवादी, काँग्रेससह भाजपच्याही काही सदस्यांनी केला आहे.

अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी विकास निधी देताना सर्व सदस्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल. कोणावरही अन्याय केला जाणार नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र सर्वपक्षीय सदस्यांनी न थांबता सीईओंशी चर्चा केली. समान निधी वाटप झाले पाहीजे, त्या शिवाय स्वीय निधीतील संबधित कामांना मंजुरी देऊ नये, अशी मागणी केली. डूडी यांनी याबाबत पूर्ण अधिकार अध्यक्षांना आहे. तरीही आपण अध्यक्षांशी चर्चा करू, तुम्ही चर्चा करा तीन दिवसात चर्चा करून मार्ग काढण्यात यावा, असे सांगितले.

यावेळी शरद लाड, अर्जुन पाटील, सुहास बाबर, अरुण बालटे, नितीन नवले, भगवान वाघमारे, अश्विनी नाईक, जयश्री पाटील, सुरेखा आडमुठे सदस्य उपस्थित होते.

Web Title: Zilla Parishad members rush to CEO for self-funding