जिल्हा परिषदेची सभा ऑनलाइनच होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:18 IST2021-06-20T04:18:46+5:302021-06-20T04:18:46+5:30
सांगली : सातारा, सोलापूर जिल्ह्यांपेक्षा सांगलीचा कोरोना पॉझिटिव्ह रेट तिपटीने जास्त आहे. यामुळे जिल्हा परिषदेची सोमवार, दि. २१ रोजी ...

जिल्हा परिषदेची सभा ऑनलाइनच होणार
सांगली : सातारा, सोलापूर जिल्ह्यांपेक्षा सांगलीचा कोरोना पॉझिटिव्ह रेट तिपटीने जास्त आहे. यामुळे जिल्हा परिषदेची सोमवार, दि. २१ रोजी होणारी सर्वसाधारण सभा ऑफलाइन घेता येणार नाही. सभा ठरल्यानुसार ऑनलाइनच होईल, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी शनिवारी दिली.
जिल्हा परिषदेतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या ४० सदस्यांनी ऑनलाइन सभेला विरोध केला आहे. तसेच सातारा, सोलापूर येथे ऑफलाइन सभा होत असतील, तर सांगली जिल्हा परिषदेला काय अडचण आहे, असा सवालही जि.प. सदस्यांनी उपस्थित केला होता. सदस्यांच्या या प्रश्नाला प्राजक्ता कोरे यांनी उत्तर दिले आहे. त्या पुढे म्हणाल्या की, जिल्हा परिषदेच्या केवळ पाच सदस्यांनीच प्रश्न विचारले आहेत. या सदस्यांना लेखी उत्तरे दिली आहेत. उर्वरित सदस्यांनी थेट प्रश्न विचारले, तरीही त्यांनाही सभेमध्ये तोंडी आणि त्यानंतर लेखी उत्तरे पाठवून देण्यात येणार आहे. यामुळे ऑनलाइन सभेमध्येही ऑफलाइन सभेप्रमाणेच भूमिका मांडण्याची संधी दिली जाईल. कुणावरही अन्याय होणार नाही. कोरोना रुग्णसंख्या आजही जास्त असल्यामुळेच केवळ ऑनलाइन सभा घेतली आहे. सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील कोरोना पॉझिटिव्ह रेट तीन टक्केपर्यंत आहे. सांगलीचा आजही कोरोना पॉझिटिव्ह रेट नऊ टक्केपर्यंत आहे. या परिस्थितीमध्ये ऑफलाइन सभा घेणे योग्य नाही. म्हणूनच जिल्हा परिषदेची सोमवार, दि. २१ रोजी होणारी सर्वसाधारण सभा ऑनलाइनच होणार आहे, असेही कोरे यांनी स्पष्ट केले.
चौकट
जिल्हा परिषदेची ऑनलाइन सभा घेण्यासाठी रविवारी सकाळी १०.३० ते ११.३० वाजता व्यवस्थित चालू शकेल का, याची चाचणी घेणार आहे. सदस्यांना ऑनलाइन सभेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठीच हा प्रयत्न आहे. सदस्यांच्या घरी आणि ग्रामपंचायत येथून ही चाचणी घेण्यात येणार आहे, असेही प्राजक्ता कोरे यांनी सांगितले.