जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:28 IST2021-04-01T04:28:06+5:302021-04-01T04:28:06+5:30
सांगली : जिल्हा परिषदेतील कामाचा ताण, वाढते दडपण अशा कारणांमुळे समाजकल्याण विभागातील एका कर्मचाऱ्याने राजीनामा देण्यासह आत्महत्या करण्याचा इशारा ...

जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा इशारा
सांगली : जिल्हा परिषदेतील कामाचा ताण, वाढते दडपण अशा कारणांमुळे समाजकल्याण विभागातील एका कर्मचाऱ्याने राजीनामा देण्यासह आत्महत्या करण्याचा इशारा बुधवारी दिला. या प्रकरणामुळे समाजकल्याण विभागात तणावाचे वातावरण होते. याबाबत कोणतीही माहिती देण्यास अथवा बोलण्यास प्रशासन तयार नव्हते. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी संबंधित कर्मचाऱ्याची समजूत काढून या प्रकरणावर पडदा टाकल्याचे समजते.
जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांमध्ये रिक्त जागा आहेत. समाजकल्याण विभागातही काही जागा रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांकडेच जादा काम सोपविण्यात आले आहे. एकाच कर्मचाऱ्याकडे दोन-तीन टेबलचे काम आहे. संबंधित कर्मचाऱ्याकडेही दलित वस्तीसह अधिकचे काम आहे. जिल्हा परिषदेत समजलेल्या माहितीनुसार संबंधित कर्मचाऱ्याकडील काही कामे प्रलंबित आहेत. त्याला प्रशासकीय कारणेच जबाबदार आहेत, असे त्याचे मत आहे. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची बाजू पूर्ण समजून न घेता, कामाचा जाब विचारला. कामे वेळेत होत नसल्याचे सांगत कारवाईचा अप्रत्यक्ष इशारा दिला. यामुळे संबंधित कर्मचारी तणावाखाली आला. त्याने थेट राजीनाम्याचाच इशारा दिला. नंतर आत्महत्येचाही इशारा दिल्याची चर्चा जिल्हा परिषदेत रंगली होती.