‘झेडपी’चे खांदेपालट राष्ट्रवादीला डोकेदुखी

By Admin | Updated: December 23, 2015 01:19 IST2015-12-23T00:54:27+5:302015-12-23T01:19:27+5:30

अधिवेशनानंतर पदाधिकाऱ्यांचे राजीनामे : सव्वा वर्षाचा कार्यकाल संपला; हालचाली गतिमान

Zeppel's NCP's headache | ‘झेडपी’चे खांदेपालट राष्ट्रवादीला डोकेदुखी

‘झेडपी’चे खांदेपालट राष्ट्रवादीला डोकेदुखी

अशोक डोंबाळे -- सांगली -जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चार सभापतींचा सव्वा वर्षाचा कार्यकाल दि. २१ डिसेंबरला संपला आहे. राष्ट्रवादीचे नेते माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील हिवाळी अधिवेशनात व्यस्त असल्यामुळे पदाधिकाऱ्यांचे राजीनामे आणि बदलाबाबत निर्णय झाला नाही. अधिवेशन संपताच ते सांगलीत येणार असून, आठ दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे. इच्छुकांची गर्दी झाली असून, प्रादेशिक समतोल राखताना राष्ट्रवादीच्या नेत्यांना कसरत करावी लागणार आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका राष्ट्रवादी आणि काँग्रेसने चिन्हावर लढविल्या. त्यावेळी भाजपचे खासदार संजयकाका पाटील, आमदार विलासराव जगताप, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि शिवसेनेचे आमदार अनिल बाबर हे दिग्गज नेते राष्ट्रवादीत होते. त्यांच्या ताकदीवर राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाले. निवडणुका होऊन चार वर्षे झाली असून, या कालावधित राष्ट्रवादीमध्ये नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादीतील बहुतांशी दिग्गज नेते भाजप, शिवसेनेत गेल्यामुळे त्यांच्या समर्थकांना पदाधिकारी बदलामध्ये कशी संधी द्यायची, यावरून पक्षांतर्गत संघर्ष पेटला आहे.
अनिल बाबर गटाच्या सदस्यांना राजेंद्रअण्णा देशमुख, अमरसिंह देशमुख, अ‍ॅड्. बाबासाहेब मुळीक यांचा जोरदार विरोध आहे. पक्ष वाढवायचा असेल तर पक्षातून बाहेर पडलेल्यांना संधी देऊ नका, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. हीच परिस्थिती जत, कवठेमहांकाळ, कडेगाव तालुक्यात आहे. जतमध्ये विलासराव जगताप समर्थक संजीवकुमार सावंत, सुशिला होनमोरे इच्छुक असून, नेत्यांनी त्यांना शब्दही दिला आहे, पण जगताप विरोधकांनी या नावांना विरोध करून सुनंदा रमेश पाटील, रूपाली विक्रमसिंह पाटील यांना संधी देण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली आहे. यामुळे येथे कुणाला संधी द्यायची, हे ठरवताना जयंत पाटील यांचे कौशल्य पणाला लागणार आहे. अध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित आहे. तासगाव तालुक्यास संधी देण्याचा निर्णय माजी गृहमंत्री आर. आर. पाटील असताना झाला होता. आता आबांच्या पश्चात तासगाव तालुक्यातील कोणाला अध्यक्षपदाची लॉटरी लागणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये नव्या सदस्यास संधी द्यायची झाल्यास घोरपडे गटाचे तानाजी यमगर यांचे नाव पुढे येऊ शकते. येथे राष्ट्रवादीच्या गटाबरोबर घोरपडे गटाचे जुळत असल्यामुळे यमगर यांना संधी मिळू शकते. या निर्णयास राष्ट्रवादीतून विरोध झाल्यास गजानन कोठावळे यांना पुन्हा संधी मिळेल.
वाळवा तालुक्यातून रणजित पाटील इच्छुक असल्यामुळे त्यांना, की विद्यमान उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांनाच पुन्हा संधी मिळणार, याबाबतही नेत्यांचा निर्णय झालेला नाही. पलूस तालुक्यात राष्ट्रवादीचा एकही सदस्य नसून, कडेगाव तालुक्यात एकमेव सुवर्णा पिंगळे या सदस्या आहेत. मागील बदलात त्यांची संधी हुकल्यामुळे यावेळी त्यांचे नाव पुढे येणार आहे. त्या पृथ्वीराज देशमुख यांच्या समर्थक असल्याने पुन्हा भाजपला संधी दिल्याचा संदेश जाणार आहे.
शिराळा तालुक्यास यापूर्वी वैशाली नाईक यांच्या रूपाने संधी मिळाली आहे. तेथे जगन्नाथ लोहार यांनी नेत्यांकडे मागणी केल्याची चर्चा आहे. खानापूर तालुक्यातून फिरोज शेख इच्छुक असून, ते अनिल बाबर समर्थक आहेत. सध्याच्या कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती मनीषा पाटील याही बाबर समर्थक आहेत. शेख यांना संधी दिल्यास मनीषा पाटील यांना थांबवावे लागेल. तथापि आटपाडी तालुक्यात बाबर गट वाढविण्यासाठी पाटील यांनाच कायम ठेवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. या निर्णयावरच शेख यांचा निर्णय अवलंबून आहे.


अधिवेशनानंतर निर्णय : विलासराव शिंदे
जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना सव्वा वर्षाचा कार्यकाल दिला होता, तो संपला आहे, हे खरे आहे. परंतु, सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे कोणतीही चर्चा झालेली नाही. अधिवेशन संपल्यानंतर माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील आणि जिल्ह्यातील अन्य प्रमुख नेत्यांची बैठक घेऊन पदाधिकारी बदलाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी दिली.


मिरज तालुका संधीपासूनदूरच...
मिरज तालुक्यात राष्ट्रवादीचे तीन सदस्य असून, त्यापैकी राजेंद्र माळी, आप्पासाहेब हुळ्ळे यांना संधी मिळाली आहे. भीमराव माने यांना संधी मिळालेली नाही, पण ते शिवसेनेत दाखल झाल्यामुळे जयंत पाटील त्यांच्या नावाचा विचार करण्याची शक्यता कमी आहे.

Web Title: Zeppel's NCP's headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.