झेडपी निवडणुकीत दिग्गज उतरणार

By Admin | Updated: June 11, 2016 01:22 IST2016-06-11T01:21:54+5:302016-06-11T01:22:23+5:30

जानेवारीमध्ये आचारसंहिता : इच्छुकांचे आता मतदार संघाच्या आरक्षणाकडे लक्ष

Zeeg will be the veteran in the elections | झेडपी निवडणुकीत दिग्गज उतरणार

झेडपी निवडणुकीत दिग्गज उतरणार

सांगली : सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या गटासाठी जाहीर झाल्यामुळे लाल दिव्याची गाडी मिळविण्यासाठी दिग्गज नेते मैदानात उतरण्याची तयारी करणार आहेत. या इच्छुकांचे आता केवळ मतदार संघाच्या आरक्षणाकडे लक्ष लागून राहिले आहे. मतदारसंघ वाचल्यानंतर ते निवडणुकीच्या तयारीसाठी लागतील. २१ मार्च २०१७ रोजी नवीन अध्यक्ष निवडला जाणार असल्यामुळे जानेवारीपर्यंत आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेची मागील निवडणूक २०१२ मध्ये झाली होती. त्यावेळीही अध्यक्षपद पहिल्या अडीच वर्षासाठी खुल्या गटासाठी खुले होते. त्यामुळे दिग्गज नेते आणि त्यांचे नातेवाईक निवडणुकीच्या स्पर्धेत उतरले होते. यातूनच प्रचंड चुरस निर्माण झाली होती. आटपाडी, जत, वाळवा, शिराळा, कडेगाव तालुक्यातील लढती अत्यंत चुरशीने झाल्या होत्या. राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाले. राष्ट्रवादीमध्ये अनेकजण अध्यक्षपदाच्या स्पर्धेत होते. पहिल्या सव्वा वर्षासाठी अमरसिंह देशमुख यांना, तर पुढील सव्वा वर्षासाठी देवराज पाटील यांना संधी मिळाली होती. त्यानंतर अडीच वर्षासाठीचे अध्यक्षपद खुल्या महिला गटासाठी आरक्षित होते. त्या जागेवर रेश्माक्का होर्तीकर यांची वर्णी लागली.
तासगाव तालुक्यातील अध्यक्ष पदासाठीचा वाद मिटला नसल्यामुळे होर्तीकर यांच्याकडे सध्या कार्यभार आहे. तोपर्यंत २०१७ नंतरचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक दिग्गज आणि त्यांचे नातेवाईक निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबरच भाजप, शिवसेनाही पूर्ण ताकतीने लढण्याची शक्यता आहे.
मिनी मंत्रालय म्हणून समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा आणि लाल दिव्याच्या गाडीचा मोह अनेकांना असतो. यातूनच आता दिग्गज मंडळी अध्यक्ष पदाचे स्वप्न बाळगून जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला लागण्याची शक्यता आहे. परिणामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीची आचारसंहिता साधारणपणे डिसेंबर अथवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. मतदान १० ते २० फेब्रुवारीदरम्यान होण्याची शक्यता आहे. नवीन अध्यक्षांची निवड २१ मार्चला होऊन, ४ एप्रिल २०१७ रोजी विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडी होण्याची शक्यता आहे.
आरक्षण जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)


हे मैदानात उतरू शकतात...
जिल्हा परिषद अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी असल्यामुळे राष्ट्रवादीकडून अमरसिंह देशमुख, देवराज पाटील, रणजित पाटील, लिंबाजी पाटील, काँग्रेसकडून शांताराम कदम, बाळासाहेब पाटील, सुरेश शिंदे, पी. एम. पाटील, भाजपकडून प्रभाकर संजयकाका पाटील, रणधीर नाईक, गोपीचंद पडळकर, मनोज जगताप, शिवसेनेकडून अभिजित पाटील, तानाजी पाटील, सुहास बाबर, भीमराव माने, बजरंग पाटील, जनसुराज्य पक्षाकडून बसवराज पाटील आदी दिग्गज त्यांचे मतदारसंघ खुले झाल्यास निश्चितच निवडणुकीच्या मैदानात उतरतील.

मतदारसंघ कमी होणार
जिल्हा परिषदेचे सध्या ६२ मतदारसंघ असून शिराळा, कडेगाव, पलूस, खानापूर आणि जत या मोठ्या गावांतील ग्रामपंचायती रद्द होऊन नगरपरिषद, नगरपंचायती झाल्या आहेत. यामुळे मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये दोन ते तीन मतदारसंघ कमी होण्याची शक्यता आहे. तेथील इच्छुक अध्यक्षपदाच्या स्पर्धेतून बाहेर पडणार आहेत.

Web Title: Zeeg will be the veteran in the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.