युवराज बावडेकर यांचा भाजप गटनेतेपदाचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:22 IST2021-02-05T07:22:37+5:302021-02-05T07:22:37+5:30
महापौर पदाच्या निवडणुकीपूर्वीच बावडेकर यांचा राजीनामा घेतल्याने महापालिका वर्तुळात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते. आता नवीन गटनेता निवडीसाठी बुधवारी ...

युवराज बावडेकर यांचा भाजप गटनेतेपदाचा राजीनामा
महापौर पदाच्या निवडणुकीपूर्वीच बावडेकर यांचा राजीनामा घेतल्याने महापालिका वर्तुळात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते. आता नवीन गटनेता निवडीसाठी बुधवारी भाजप नगरसेवकांची बैठक होत आहे.
बावडेकर यांनी सोमवारी सकाळी शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, आमदार सुधीर गाडगीळ, भाजपचे नेते शेखर इनामदार यांची भेट घेऊन गटनेते व सभागृह नेतेपदाचा राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर महापालिकेत येऊन महापौर गीता सुतार यांच्याकडे राजीनाम्याची प्रत सोपविली.
२०१८ च्या महापालिका निवडणुकीत भाजपला प्रथमच स्वबळावर सत्ता मिळविण्यात यश आले. अनुभवी नगरसेवक म्हणून युवराज बावडेकर यांच्याकडे भाजपच्या गटनेतेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. आता भाजप सत्तेला अडीच वर्षे पूर्ण होत आली आहेत. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे. तत्पूर्वीच बावडेकर यांनी गटनेतेपदाचा राजीनामा सुपूर्द केल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली. बावडेकर हेही महापौर पदासाठी इच्छुक आहेत. भाजपचे निष्ठावान म्हणून त्यांची ओळख आहे. आता त्यांनी गटनेतेपदाचा राजीनामा दिल्याने त्यांचे नाव महापौर पदाच्या शर्यतीत चर्चेत आले आहे.
दरम्यान, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे म्हैसाळकर म्हणाले की, आगामी महापौर निवड आणि गटनेतेपद राजीनाम्याचा काही संबंध नाही. महापालिकेतील सत्तेचा निम्मा काळ संपत आला आहे. त्यामुळे इतर सदस्यांना गटनेतेपदाची संधी मिळावी, यासाठी पक्षाने बावडेकर यांचा राजीनामा घेतल्याचे सांगितले. आता नवीन गटनेता निवडीसाठी बुधवारी २७ रोजी आमदार सुधीर गाडगीळ व कोअर कमिटी सदस्यांंच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक होणार आहे.
चौकट
कोट
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची रविवारी कोल्हापुरात भेट झाली. त्यांनी नवीन सदस्याला संधी देण्यासाठी गटनेतेपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले. पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने सोमवारी पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. यापुढे पक्ष जी जबाबदारी देईल, ती निष्ठेने पार पाडू.
- युवराज बावडेकर, माजी गटनेते, भाजप