आष्ट्यामधील शिपायाच्या मुलाची ‘युपीएससी’त बाजी
By Admin | Updated: May 11, 2016 00:45 IST2016-05-11T00:09:49+5:302016-05-11T00:45:51+5:30
शकील संदेचे यश : शहरात आनंदोत्सव साजरा
आष्ट्यामधील शिपायाच्या मुलाची ‘युपीएससी’त बाजी
सुरेंद्र शिराळकर -- आष्टा -येथील शकील युसूफ संदे याने २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या युपीएससी (भारतीय प्रशासकीय सेवा) परीक्षेमध्ये नेत्रदीपक यश मिळविले. आष्टा येथील श्री गणेश नागरी सह. पतसंस्थेत वडील युसूफ संदे यांनी शिपाई म्हणून काम केले. एका पतसंस्थेच्या शिपायाचा गरीब, होतकरू, जिद्दी मुलगा युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याची बातमी समजताच आष्ट्यात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मित्रमंडळींनी पेढे वाटून आनंद साजरा केला. शकील संदे देशात १०६३ व्या क्रमांकाने युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाला.
शकील संदे याचे मूळ गाव आष्टा. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. थोडीफार शेती व वडील युसूफ संदे गणेश पतसंस्थेत शिपाई म्हणून काम करीत होते. पत्नी, दोन मुले व मुलगी असे छोटेसे कुटुंब. मात्र सर्वांनाच कष्टाची सवय. शेती व संस्थेच्या तुटपुंज्या पैशावर कसातरी उदरनिर्वाह होत होता. शकीलचे प्राथमिक शिक्षण अण्णासाहेब डांगे यांच्या प्राथमिक आश्रमशाळेत झाले. पाचवी ते दहावी विलासराव शिंदे विद्यालयात झाले. अकरावी, बारावी के. बी. पी., कोल्हापूर येथे झाल्यानंतर राहुरी विद्यापीठाअंतर्गत कोल्हापूर येथे २००९ मध्ये बी. टेक.चे शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर आयआयसीटीमध्ये एमबीएचे शिक्षण पूर्ण झाले.
२०१३ पासून शकीलने युपीएससीचा अभ्यास सुरू केला. प्रि. आयएएस ट्रेनिंग सेंटर, कोल्हापूर, यशदा, पुणे, हज हाऊस, मुंबई या ठिकाणच्या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन त्याला लाभले. अहोरात्र मेहनत करीत असताना २०१४ च्या परीक्षेला पहिल्यांदा शकील सामोरा गेला. मुख्य परीक्षेपर्यंत मजल गेली. मात्र अपयशाने खचून न जाता त्याने पुन्हा जिद्दीने अभ्यास केला. दुसऱ्या प्रयत्नात शकील संपूर्ण भारतात १०६३ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. शकील उत्तीर्ण झाल्याचे समजताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.
शकील संदे सध्या कोल्हापूर येथील भारतीय स्टेट बॅँकेत अधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्याच्या यशाने आष्ट्यात उत्साहाचे वातावरण आहे.
बी. के. चौगुले आष्ट्याचे पहिले आयएएस...
बी. के. चौगुले आष्ट्याचे पहिले आयएएस होते. त्यांनी महाराष्ट्राचे उपसचिव म्हणून काम केले होते. त्यांच्यानंतर शकील संदे हा युपीएससी उत्तीर्ण झाल्याने आष्टेकरांच्या आशा वाढल्या आहेत. आष्टा येथील सचिन ढोले हे उपजिल्हाधिकारी झाले, तर त्यांचे बंधू प्रशांत ढोले पोलिस उपअधीक्षक झाले आहेत. त्यांच्या घरानजीक असणारे शकील संदे युपीएससी उत्तीर्ण झाल्याने चव्हाणवाडीची ओळख अधिकाऱ्यांचा परिसर अशी झाली आहे.
प्राथमिक शिक्षण आश्रमशाळेत होऊनसुद्धा व त्याने कोणताही खासगी क्लास न लावता युपीएससीसारख्या देशपातळीवरील परीक्षेमध्ये आष्टा शहराचे नाव मोठे केल्याने ग्रामीण भागातील शिक्षण शहरी भागाच्या तोडीचे आहे, ही बाब स्पष्ट झाली आहे.
शकील यांचा टॅक्स इन्स्पेक्टर नाजनीन मुल्ला-संदे यांच्याशी नुकताच ८ मे रोजी विवाह झाला. विवाह सोहळ््याचा आनंद सुरू असतानाच शकील युपीएससी पास झाल्याची बातमी समजल्याने दुग्धशर्करा योग जुळून आला.