सांगली : अंकली (ता. मिरज) येथे शनिवारी रात्री गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचण्यावरून झालेले भांडण सोडवण्यास गेलेल्या शीतल धनपाल पाटील (वय २५, रा. अंकली) याला तिघांनी चाकूने भोसकले. या हल्ल्यानंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सांगली ग्रामीण पोलिसांनी संशयित विकास बंडू घळगे (३५), क्षितिज ऊर्फ आप्पा शशिकांत कांबळे (२८), आदित्य शंकर घळगे (२२, रा. अंकली) या तिघांना अटक केली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंकली येथील शिवशक्ती चौकातील गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक शनिवारी रात्री निघाली होती. रात्री दहाच्या सुमारास विकास घळगे हा मिरवणुकीत घुसून नाचू लागला. तेव्हा मंडळाचे सदस्य सुनील पाटील यांनी त्याला अडवले. तू आमच्या मिरवणुकीत नाचू नकोस, असे त्याला सुनावले. तेव्हा त्याने सुनील पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा पाटील यांचा पुतण्या शीतल पाटील हा भांडण सोडवण्यास गेला.त्यावेळी विकासचे साथीदार क्षितिज आणि आदित्य मिरवणुकीत आले. सुनील पाटील यांना मारण्यासाठी ते अंगावर धावून गेले. शीतल पाटील हा मध्ये गेला. तेव्हा क्षितिज याने कमरेला लावलेला चाकू बाहेर काढून शीतलच्या पोटात खुपसला. विकास आणि आदित्यनेदेखील चाकू काढून शीतलच्या पाठीवर, मांडीवर वार केले. शीतल गंभीर जखमी होऊन त्याच्या पोटातून आतडी बाहेर आली. तो विव्हळत खाली पडल्यानंतर तिघेजण शिवीगाळ, दमदाटी करत निघून गेले.मिरवणुकीत चाकूहल्ला झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. अनेकांची पळापळ झाली. जखमी शीतल याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. हल्ल्यानंतर गावात तणावाचे वातावरण होते. सांगली ग्रामीण पोलिसांनी तातडीने परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात केला.जखमी शीतल पाटील याचा चुलतभाऊ सुशील सुनील पाटील (२४) याने तिघा संशयितांविरुद्ध खुनी हल्ला केल्याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तिघा हल्लेखोरांना तातडीने अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक नितीन बाबर तपास करीत आहेत.आदित्य घळगे रेकॉर्डवरील गुन्हेगारअंकली येथील शीतल पाटील याच्यावर खुनी हल्ला करणाऱ्या तिघांपैकी आदित्य घळगे हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल आहे.
Sangli: अंकलीत मिरवणुकीत नाचण्याच्या वादातून तरुणाला भोसकले, तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 16:41 IST