आटपाडी तालुक्यात ‘हनी ट्रॅप’मधून तरुणांना लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:20 IST2021-05-31T04:20:28+5:302021-05-31T04:20:28+5:30
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आधी संपर्क साधून नंतर थेट नको त्या अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल करण्याची ...

आटपाडी तालुक्यात ‘हनी ट्रॅप’मधून तरुणांना लुटले
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील तरुणांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आधी संपर्क साधून नंतर थेट नको त्या अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक प्रकरणे घडत आहेत. महिनाभरात आटपाडीतील २५ हून अधिक तरुण या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकून लुटले गेल्याची चर्चा आहे.
सध्या शाळा-महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे फेसबुक आणि व्हॉटस्ॲपवर सतत मग्न असणाऱ्या तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. या तरुणांना सध्या हनी ट्रॅपमध्ये अडकविले जात आहे. ही फसवणुकीची पद्धत अशी आहे : सुरुवातीला तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट येते. मग मोबाइल नंबर घेतला जातो. नंतर थेट व्हिडिओ कॉल केला जातो. ती तरुणी हिंदीत लडिवाळपणे संभाषण करीत एकेक कपडे उतरविते. तरुणालाही अंगावरील कपडे काढण्याचा आग्रह करते. हे तरुण कसलाही विचार न करता सगळे कपडे उतरवितात. हे सगळे रेकॉर्ड होत असते. नंतर तिकडून फोन येतो की, ‘त्या तरुणीने तुमच्यामुळे आत्महत्या केलीय, तुमचे लोकेशन आम्ही तपासत आहोत. आम्ही अमक्या-तमक्या पोलीस ठाण्यातून बोलत आहोत’ किंवा काही तरुणांना त्याचाच व्हिडिओ पाठवून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली जात आहे. तरुणांच्या ऐपतीनुसार पैशाची रक्कम ठरली जात आहे.
या प्रकारामुळे अनेक तरुण हादरून गेले आहेत. अनेक जण लुटले गेले आहेत; पण अब्रूच्या भीतीने आतापर्यंत कुणीही आटपाडी पोलीस ठाण्यात गेलेले नाही.
चौकट
पैसेही गेले आणि अब्रूही गेली तर?
फसलेल्या अनेक तरुणांमध्ये भीती आहे. त्यांना पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी बोलत असल्याचे सांगून भीती घातल्याने नसती झंजट नको म्हणून तरुण सांगितलेल्या बँक खात्यावर पैसे भरत आहेत. एका तरुणाने ८० हजार दोन वेळा भरले, तरीही त्याचा पिच्छा सोडला नाही. विशेष म्हणजे एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांना या प्रकाराला सामोरे जावे लागले. त्यांनी सरळ पालकांना सांगितले.
कोट
तरुणांनी किंवा कुणीही अनोळखी महिलेशी सलगी, मैत्री वाढवू नये. त्यांना कसली वैयक्तिक माहिती देऊ नये. असा प्रकार ज्यांच्या सोबत घडला आहे त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा.
- भानुदास निंभोरे,
पोलीस निरीक्षक, आटपाडी