पोलीस भरतीसाठी पलूसमध्ये तरुणांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:24 IST2021-03-24T04:24:49+5:302021-03-24T04:24:49+5:30
आंदोलनात प्रकाश भोरे, माजी सैनिक शरद पाटील, संभाजी ब्रिगेडचे राहुल कांबळे, सामाजिक कार्यकर्ते श्रीदास होनमाने, क्रांतिसिंह प्रतिष्ठानचे शिवश्री अभिमन्यू ...

पोलीस भरतीसाठी पलूसमध्ये तरुणांचा मोर्चा
आंदोलनात प्रकाश भोरे, माजी सैनिक शरद पाटील, संभाजी ब्रिगेडचे राहुल कांबळे, सामाजिक कार्यकर्ते श्रीदास होनमाने, क्रांतिसिंह प्रतिष्ठानचे शिवश्री अभिमन्यू पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
पलूस येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून व पुष्पहार अर्पण करून, पलूस तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आणि प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
आंदोलकांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील तीन वर्षे झाली, पोलीस भरती झाली नाही. विद्यार्थ्यांचे एका बाजूला वय वाढत असूनही पोलीस भरतीचे स्वरूप स्पष्ट नाही. प्रतीक्षा यादीतील मुलांचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. याबाबत शासनाने ठोस भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा एप्रिलमध्ये मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा दीपक लाड यांनी दिला.
ते म्हणाले, राज्यामध्ये पोलिसांचा तुटवडा असताना नवीन पोलीस भरतीसाठी शासन उदासीन आहे. पोलीस भरतीमध्ये पारदर्शकता आणून तात्काळ भरती करावी अन्यथा राज्यातील सर्वात मोठे आंदोलन पलूस येथून करणार आहे.
राहुल कांबळे म्हणाले, पोलीस भरती सुलभ व्हावी, सामान्य कष्टकरी कुटुंबातील मुलांना होणारा त्रास थांबवावा.
यावेळी प्रतीक्षा जाधव, सारिका बेवणुरे, आशिष पाटील, पोपट सूर्यवंशी, हनिफ शेख, कुमार जावीर, सूरज महाराज सोळवंडे, युवराज पवार, रोहित कुपेकर, शिवाजीराव रावळ, अनिकेत माळी, गणेश गायकवाड यांच्यासह तालुक्यातील पोलीस भरती होणारे शेकडो तरुण-तरुणी मोर्चासाठी उपस्थित होते.