मिरज (जि. सांगली) : आरग (ता. मिरज) येथे सुजल बाजीराव पाटील (वय २१, रा. आरग) या तरुणाचा त्याच्याच दोघा मित्रांनी खून केला. आरग ते बेळंकी रस्त्यावर गावतलावाशेजारी मंदिरात त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर मृतदेह तलावात फेकून देण्यात आला. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी दोन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतले आहे. सुजलने अनैसर्गिक संबंधांना विरोध केल्यानेच त्याचा दारूच्या नशेत मित्रांनी पाण्यात बुडवून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.सुजल हा आई व अन्य नातेवाइकांसमवेत एसटी स्थानक परिसरात राहण्यास होता. शनिवारी तो त्याच्यासोबत मजुरी करणाऱ्या दोघा मित्रांसोबत बेळंकी (ता. मिरज) येथे जेवणासाठी गेला होता. तेथे तिघांनीही मद्यप्राशन केले. रात्री साडेनऊच्या सुमारास तिघेही घरी परत येत होते. आरग तलावाजवळ आल्यानंतर दुचाकीवर बसण्यावरून त्यांच्यात वाद झाला. तलावाशेजारीच एक छोटे मंदिर आहे. तेथे तिघे बसले असता यातील एका संशयिताने नशेत सुजलसोबत अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. सुजलने त्याला विरोध केला. त्यावेळी इतर दोघांनी त्याला मारहाण केली. तलावात नेऊन पाण्यात बुडविले. त्यातच सुजलचा मृत्यू झाला. सुजलचा मृतदेह पाण्यात टाकून दोघांनी पलायन केले.
आईचा आधार गेलासुजल आईसोबत राहत होता. मिळेल ते काम करुन चरितार्थ सुरु होता. त्याच्या निधनाने आईचा आधार गेला आहे. सुजलच्या मृत्यूची बातमी समजताच नातेवाइकांनी आक्रोश केला.