राजीव सातव यांच्या निधनाने युवक काॅंग्रेस अस्वस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:25 IST2021-05-17T04:25:26+5:302021-05-17T04:25:26+5:30
प्रताप महाडिक लोकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे काँग्रेसचे कार्याध्यक्ष व राज्यमंत्री ...

राजीव सातव यांच्या निधनाने युवक काॅंग्रेस अस्वस्थ
प्रताप महाडिक
लोकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव : काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे काँग्रेसचे कार्याध्यक्ष व राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना मोठा धक्का बसला आहे. याशिवाय पलूस कडेगाव मतदार संघ आणि सांगली लोकसभा युवक काँग्रेसमधील आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता दिसून येत आहे.
राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेले व देशाचे राजकारण हाकणारे आमचे प्रेरणास्थान हरपले आहे, अशा शब्दात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राजीव सातव यांचा सांगली जिल्ह्याशी व विशेषतः पलूस कडेगाव मतदारसंघाशी जवळचा संपर्क होता. राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम आणि राजीव सातव यांनी युवक काँग्रेसमध्ये एकत्रित काम केले आहे. ज्येष्ठ काॅंग्रेस नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या कार्यकर्तृत्वाचा त्यांना अभिमान होता. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर १९ फेब्रुवारी २०२० रोजी शिवजयंतीनिमित्त राजीव सातव व वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख हे सांगली जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी चिंचणी येथील शिवजयंती कार्यक्रमालाही ते उपस्थित होते.
सोनसळ येथे राजीव सातव यांच्या हस्ते डॉ. विश्वजित कदम यांचा नागरी सत्कार झाला होता. यावेळी विश्वजित कदम यांच्यात राष्ट्रीय नेतृत्वाची क्षमता आहे. त्यांचे नेतृत्व जपा, असा संदेश राजीव सातव यांनी कार्यकर्त्यांना दिला होता. कडेगाव येथील अभिजीत कदम कुस्ती संकुलातील पैलवानांबरोबर थंडाईचा आस्वाद घेतला होता. याशिवाय २०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी धनकवडी (पुणे) येथे डॉ. विश्वजित कदम यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात उपस्थित राहून मार्गदर्शन करत कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता.
चौकट :
बंधुत्वाचे नाते
डॉ. विश्वजित कदम हे युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असताना राजीव सातव हे प्रदेशाध्यक्ष होते तर डॉ. विश्वजित कदम हे प्रदेशाध्यक्ष असताना राजीव सातव हे राष्ट्रीय अध्यक्ष होते. या काळात डॉ. विश्वजित कदम यांना राजीव सातव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते. त्यांच्यात बंधुत्वाचे नाते आणि सलोख्याचे संबंध होते.