युवा संघर्ष संदेश जथ्याचे सांगलीत स्वागत
By Admin | Updated: October 6, 2015 00:34 IST2015-10-05T23:36:09+5:302015-10-06T00:34:50+5:30
कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग : दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येचा निषेध

युवा संघर्ष संदेश जथ्याचे सांगलीत स्वागत
सांगली : डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांच्यासारख्या थोर समाजसेवकांना गमावण्याची वेळ पुरोगामी समाजावर आली आहे. त्यामुळे आधुनिक काळाकडे जाण्यापासून रोखणाऱ्या प्रवृत्तींची समाजाला ओळख होण्यासाठी युवा संघर्ष संदेश जथ्याचे आयोजन करण्यात आल्याचे प्रीती शेखर यांनी सोमवारी सांगितले. या संदेश जथ्याचे सांगलीत जोरदार स्वागत करण्यात आले. डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन आॅफ इंडियाच्यावतीने कोल्हापूर येथून निघालेल्या संदेश जथ्याचे सांगलीत आगमन झाले. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या जथ्याचे स्वागत करण्यात आले. अवैज्ञानिक विचारांचा प्रसार करण्यासाठी व जातीव्यवस्था बळकट करण्यासाठी समाजातील काही प्रवृत्तींकडून समाजात बदल घडवणाऱ्या समाजसेवकांवर हल्ले होत आहेत. पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र ही राज्याची ओळख कायम राहावी, हा या जथ्याचा मुख्य उद्देश आहे. हा संदेश जथा १६ जिल्ह्यांचा दौरा करणार असून ९ आॅक्टोबर रोजी औरंगाबादमध्ये फेडरेशनच्या राज्य अधिवेशनात सामील होणार आहे.
यावेळी रत्नाकर नांगरे, डॉ. प्रदीप पाटील, गौतमीपुत्र कांबळे, बिराज साळुंखे, विशाल साळुंखे, उमेश देशमुख, सरनाथ कांबळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कवठेमहांकाळमध्येही स्वागत-कवठेमहांकाळ : युवा संघर्ष जथ्याचे कवठेमहांकाळ येथे विविध पुरोगामी संघटनांच्या तसेच राजर्षी शाहू विचार मंचच्यावतीने स्वागत करण्यात आले. संस्थापक प्रा. दादासाहेब ढेरे, कॉम्रेड नामदेवराव करगणे यांनी स्वागत केले. यावेळी प्रीती शेखर, सुभाष कोळी, दिलीप शुक्ला, उमेश देशमुख आदी होते.