निसर्गरम्य सागरेश्वरमध्ये रंगलं ‘आपलं साहित्य संमेलन’

By Admin | Updated: September 11, 2014 00:12 IST2014-09-10T23:11:13+5:302014-09-11T00:12:47+5:30

कविसंमेलनाला दाद

Your 'Sahitya Sammelan' organized in scenic Sagareshwar | निसर्गरम्य सागरेश्वरमध्ये रंगलं ‘आपलं साहित्य संमेलन’

निसर्गरम्य सागरेश्वरमध्ये रंगलं ‘आपलं साहित्य संमेलन’

देवराष्ट्रे : वार रविवार... सागरेश्वर अभयारण्यातील निसर्गरम्य ठिकाण... आभाळातून पळणारे ढग अन् मध्येच डोकावणारा सूर्यनारायण, पक्ष्यांचा किलबिलाट अन् मधूनच येणारा मोरांचा केंकारणारा आवाज... अशा विलोभनीय वातावरणात ‘आपलं साहित्य संमेलन’ दिलखुलास रंगलं. दिवसभरात पावसाची सर आलीच नाही. मात्र विविध विषयाला स्पर्श करणाऱ्या काव्यधारांनी उपस्थित श्रोते न्हाऊन निघाले.निमित्त होतं सागरेश्वर अभयारण्याचे जनक, साहित्यिक, वृक्षमित्र धों. म. मोहिते यांच्या स्मृतिदिनाचं. कडेगाव-खानापूर तालुका साहित्य परिषद व वृक्षमित्र धों. म. मोहिते चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने प्रतिवर्षी स्मृतिदिनानिमित्त ‘आपलं साहित्य संमेलन’ आयोजित केले जाते. यंदाचे संमेलनाचे पाचवे वर्ष. या संमेलनात ना सभामंडप ना ध्वनिक्षेपकाची सोय, ना निमंत्रण पत्रिका ना जेवणाची सोय. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक साहित्यिक घरातूनच जेवणाची शिदोरी बरोबर घेऊन येतो, हे या संमेलनाचं आगळंवेगळं वैशिष्ट्य. साहित्यिक रघुराज मेटकरी यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन पार पडले. यावेळी समाधान पोरे यांना वृक्षमित्र धों. म. मोहिते ‘पर्यावरण पत्रकार’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मेटकरी यांच्याहस्ते व अ‍ॅड. सुभाष पाटील, प्रा. विश्वनाथ गायकवाड, बी. टी. महिंद, रानकवी सु. धों. मोहिते यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण झाले. मेटकरी म्हणाले, ग्रामीण साहित्य समाजापर्यंत पोहोचले पाहिजे. नवोदित लेखकांना पाठबळ मिळणे आवश्यक आहे. संमेलनात राजा रावळ, रवी राजमाने, स्वाती पवार, प्रा. विजय जंगम, भानुदास आंबी, एकनाथ गायकवाड, अरविंद पत्की, अनुराधा पत्की, किरण भिंगारदेवे, किरण शिंदे, जयवंत आवटी, बाळ बाबर, प्रदीप सुतार, बाळासाहेब मोहिते, अनिल पवार सहभागी झाले होते. (वार्ताहर)

कविसंमेलनाला दाद
वनभोजनानंतर दुसऱ्या सत्रात कविसंमेलन चांगलेच रंगले. हौसाताई जाधव यांनी सागरेश्वर अभयारण्य उभारणीतील कामाचे चित्र गीतातून उभे केले. राहुल वीर यांनी ‘आयुष्याचा नवा रंग’ काव्यातून सादर केला. अंधकवी चंद्रकांत देशमुख यांनी शेजारील राष्ट्राच्या कारवायांवर प्रकाशझोत टाकला, तर सौ. संजीवनी कुलकर्णी यांनी ‘सावधान माणसा’ असा कवितेतून इशारा दिला. एम. बी. जमादार यांनी गझल सादर केली.

Web Title: Your 'Sahitya Sammelan' organized in scenic Sagareshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.