तरुणांनो, उज्ज्वल भवितव्यासाठी ज्ञानाची कास धरा
By Admin | Updated: August 2, 2015 23:08 IST2015-08-02T23:08:10+5:302015-08-02T23:08:10+5:30
उदय निर्गुडकर : इस्लामपुरात राजारामबापू व्याख्यानमालेत आवाहन

तरुणांनो, उज्ज्वल भवितव्यासाठी ज्ञानाची कास धरा
इस्लामपूर : देशाचे भविष्य उज्ज्वल आहे. ऐहिक सुखाचा त्याग करा, मात्र ज्ञानाच्या सुखाचा त्याग करु नका. ज्ञानाची कास धरा. तुमचे भवितव्य उज्ज्वल असेल. त्यासाठी तरुण पिढीने मूलभूत संशोधनाकडे वळावे, असे आवाहन ज्येष्ठ संशोधक व पत्रकार डॉ. उदय निर्गुडकर यांनी केले.येथील राजारामबापू नाट्यगृहात लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या स्मृतिदिनी आयोजित केलेल्या नगर व्याख्यानमालेत डॉ. निर्गुडकर यांनी ‘स्वप्न पाहा, स्वप्न जगा’ या विषयावर पहिले पुष्प गुंफले. हे व्याख्यान ताजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना समर्पित केले. माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्याहस्ते या पाचव्या वर्षीच्या व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड अध्यक्षस्थानी होते. यावेळी माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, लोकनेते राजारामबापू पाटील, लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.डॉ. निर्गुडकर म्हणाले, सध्या शिक्षण घेणाऱ्यांसह अंधश्रध्दाळूंची संख्या वाढते आहे. कायदा करूनही अज्ञान-अंधश्रध्दा दूर होत नाही. संवादाची साधने वाढत असताना, मानसिक असुरक्षितता वाढते आहे. त्यामुळेच सध्या भांडवली आणि जातीय अशा तत्त्वप्रणालींचे राज्य आहे. जागतिकीकरणाचे लाभ शेवटच्या स्तरापर्यंत न पोहोचल्याने गरिबीचे प्रचंड मोठे जाळे निर्माण झाले आहे. त्यामुळे यापुढे शिक्षणाची गुणवत्ता उंचावून त्यावरील गुंतवणूकही वाढवली पाहिजे. घनकचरा, ई-कचरा व्यवस्थापनाची मोठी गरज भासेल. माहिती-तंत्रज्ञानात उद्याचे विश्व भारताचे आहे. त्यामुळे युवा पिढीने मोठी स्वप्ने पाहताना मूलभूत संशोधनाकडे वळावे.आ. जयंत पाटील म्हणाले, आमचा परिसर आणि इथले नागरिक वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ झाले पाहिजेत, या उद्देशाने ही व्याख्यानमाला घेत आहोत. वैचारिक अभिसरणाच्या या उपक्रमाला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे, याचा आनंद वाटतो.नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांनी स्वागत, अॅड. चिमण डांगे यांनी प्रास्ताविक, डॉ. सूरज चौगुले यांनी सूत्रसंचालन, उपनगराध्यक्ष संजय कोरे यांनी आभार मानले. व्यासपीठावर सदाभाऊ खोत, विजयभाऊ पाटील, खंडेराव जाधव, अरुणादेवी पाटील, शहाजी पाटील, प्रांताधिकारी विजयसिंह देशमुख, मुख्याधिकारी नीलेश देशमुख, प्रा. शामराव पाटील, विनायकराव पाटील, सुधीर पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)
तुम्हास वाटते तसे नाही..!
स्वाभिमानीचे प्रदेश अध्यक्ष सदाभाऊ खोत श्रोत्यांमध्ये बसले होते. आ. जयंत पाटील यांनी त्यांना व्यासपीठावर येण्याचे निमंत्रण देताना, मी त्यांचा हितचिंतक आहे. मात्र माझ्याजवळ येण्याने त्यांना त्रास होईल, अशी भीती वाटते, असे म्हटले होते. त्याचा धागा पकडत डॉ. निर्गुडकर यांनी जयंतरावांना टोला मारताना, तुम्हास जे वाटते, तसे आम्हास वाटत नाही. तेथे (मंत्रिपदावर) वर्णी लागण्यासाठी काय त्रास, वेदना आहेत, त्या त्यांनाच (सदाभाऊंना) ठावूक, असे म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
कृतिशील अन् निष्कलंक नेता..!
डॉ. निर्गुडकर म्हणाले की, कामाच्या निमित्ताने अनेक नेत्यांशी भेटता, बोलता आले. अनेकांचे घोटाळे समोर आले. बहुतांश नेते घोटाळ्यात अडकले. मात्र आमदार जयंत पाटील हे कृतिशील व निष्कलंक नेते ठरले आहेत. त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी मिळत नाही. लोकनेते बापूंच्या स्मृतिदिनी समाजाला विचार देण्याची त्यांची कृतिशील दूरदृष्टी अभिनंदनीय आहे.