बिऊरच्या तलावात पोहताना रिळेचा तरुण बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:51 IST2021-03-04T04:51:34+5:302021-03-04T04:51:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : बिऊर-शांतीनगर (ता. शिराळा) येथील पाझर तलावात पोहताना शिराळ्याच्या तरुणाचा मृत्यू झाला. सुनील तानाजी गोसावी ...

बिऊरच्या तलावात पोहताना रिळेचा तरुण बुडाला
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : बिऊर-शांतीनगर (ता. शिराळा) येथील पाझर तलावात पोहताना शिराळ्याच्या तरुणाचा मृत्यू झाला. सुनील तानाजी गोसावी (वय ३३, रा. रिळे) असे त्याचे नाव असून, ही घटना बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. मृतदेह सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान मिळाला.
शिराळा-कोकरूड रस्त्याजवळ असणाऱ्या या पाझर तलावात सुनील गोसावी, त्याचा सख्खा भाऊ संतोष (दोघेही राहणार रिळे, ता. शिराळा) व त्यांचे मावसभाऊ जगन्नाथ गणपती वसूरकर व सुभाष गणपती वसूरकर (दोघे राहणार म्हापसा, गोवा) आणि सुनीलचे मामा विठ्ठल भीमराव घाडगे पोहायला गेले होते. अर्धा तास पोहल्यानंतर संतोष गोसावी, विठ्ठल घाडगे, सुभाष वसूरकर, जगन्नाथ वसूरकर बाहेर आले. त्यांनी तलावातून बाहेर येऊन कपडे घातले. सुनीलला बाहेर येण्यासाठी ते विनंती करत होते, मात्र तो तलावातच पोहत होता.
दरम्यान, त्याला दम लागल्यामुळे तो पाण्यात बुडू लागला. त्यावेळी त्याला बाहेर काढण्यासाठी भाऊ संतोषने प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी ठरला व त्याचा बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी नागरिकांच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; पण पाणी जास्त असल्यामुळे मृतदेह सापडला नाही.
त्यानंतर कांदे येथील हणमंत गोसावी यांना बोलावले व त्यांनी टायरवरून पोहत जाऊन बांबूच्या साहाय्याने मृतदेह ढकलत पुढे आणला व नंतर सुनीलचा भाऊ संतोषने मृतदेह बाहेर काढला. साडेसहाच्या दरम्यान मृतदेह बाहेर काढल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी आक्रोश केला.
सुनीलचे मूळ गाव इस्लामपूर असून, पंधरा वर्षांपासून रिळे येथे हे कुटुंब स्थायिक झाले आहे. सुनील इस्लामपूर येथे बांधकाम मजूर म्हणून गवंड्याच्या हाताखाली काम करत होता. आई-वडील मोलमजुरी करतात. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.