बिरनाळ तलावात पोहताना जतचा तरुण बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:51 IST2021-03-04T04:51:32+5:302021-03-04T04:51:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जत : जत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बिरनाळ (ता. जत) येथील साठवण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात ...

बिरनाळ तलावात पोहताना जतचा तरुण बुडाला
लोकमत न्यूज नेटवर्क
जत : जत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बिरनाळ (ता. जत) येथील साठवण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. विनायक वसंत कलाल (वय २०, रा. संभाजी चौक, जत) असे त्याचे नाव असून, ही घटना बुधवारी दुपारी तीनच्या दरम्यान घडली.
मृतदेह शोधण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. विनायक कलाल व त्याचे मित्र सागर कोळी (२२, रा. विठ्ठलनगर, जत), मयुर संतोष भद्रे (२१, रा. संभाजी चौक), विनायक शाम ननवरे (२०, रा. शिवाजी चौक), सागर सिद्राया भंडारे (२०, रा. रोहिदासनगर), अभिषेक अर्जुन जमदाडे (२२, रा. मंगळवार पेठ) हे दुपारी अडीचच्या दरम्यान घरातून पोहण्यासाठी बिरनाळ साठवण तलावात गेले होते. त्यातील सागर कोळी, मयुर भद्रे, विनायक ननवरे यांना काही प्रमाणात पोहता येत होते, तर सागर भंडारे, अभिषेक जमदाडे व विनायक कलाल यांना पोहता येत नव्हते. विनायक कलाल पाण्यात दगडावर उभा होता व पोहण्याचा प्रयत्न करत होता. त्या दरम्यान पाय दगडावरून घसरून तो पाण्यात पडून बुडू लागला. यावेळी सागर कोळी याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला असता विनायकने त्याला पाण्यातच मिठी मारली. त्यामुळे सागरने घाबरून त्याला बाजूला केले व तो स्वतः बाजूला पोहत आला. विनायकला पोहता येत नसल्यामुळे पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.
विनायक शेगाव रस्त्यावरील एमके गॅरेज येथे मेकॅनिक म्हणून काम करत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ व बहीण आहे. रात्री उशिरापर्यंत प्रकाशझोतात मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते.