रेड येथे अपघातात तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:18 IST2021-07-04T04:18:55+5:302021-07-04T04:18:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : रेड (ता. शिराळा) येथील मरळे वस्तीजवळ ट्रक व दुचाकीच्या धडकेत दीपक आनंदा पाटील (वय ...

रेड येथे अपघातात तरुण ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : रेड (ता. शिराळा) येथील मरळे वस्तीजवळ ट्रक व दुचाकीच्या धडकेत दीपक आनंदा पाटील (वय ३५, रा. रेड) यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान घडली असून ट्रकचालक देवेंद्र माटप्पा शिंगणे (रा. सांगली) यास शिराळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रेड येथील पेट्रोल पंपाजवळ मरळे वस्ती आहे. येथे सिमेंट उतरून ट्रक (क्रमांक एमएच १० झेड १३२७) सांगलीकडे जाण्यासाठी मुख्य रस्त्यावर येत होता. या वेळी दुचाकीवरून (क्रमांक एमएच १० बीयू ७७८८) दीपक पाटील पेठ नाक्याकडे निघाले होते. या वेळी ट्रक व दुचाकीची धडक झाली. यामध्ये दीपक गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कराड येथे दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेबाबत जयसिंग पाटील यांनी वर्दी दिली असून तपास हवालदार भाऊसाहेब कुंभार करीत आहेत. दीपक पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.