लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त युवा उद्योजक शिबिराचे आयोजन केले आहे. ही माहिती सत्कार समितीमार्फत देण्यात आली. हे शिबिर साई संस्कृती हॉलमध्ये सोमवार, दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता हाेत आहे.
हे शिबिर प्रामुख्याने युवकांसाठी आहे. शिराळा, वाळवा व शाहूवाडी तालुक्यातील युवकांमध्ये उद्योजकता वाढावी व तो आपल्या पायावर सक्षम बनावा, हा या शिबिराचा उद्देश आहे. शेती करणाऱ्या युवकांना शिबिरामध्ये प्रमुख्याने लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे. या विभागातील शेतकरी अल्प, अत्यल्प भूधारक आहेत. शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर उपजीविका करणे जिकिरीचे होते. याचा विचार करून असलेल्या शेतीमध्ये आपण आधुनिकता आणून जादा उत्पन्न मिळवू शकतो. मिळालेले उत्पन्न कोणत्या बाजारपेठेत व कोणत्या वेळी पोहाेचवल्याने आपणास फायदा होईल, यासाठी हे शिबिर महत्त्वाचे ठरणार आहे.
शिबिरात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते शरद तांदळे मार्गदर्शन करणार आहेत. युवकांसाठी हे शिबिर प्रेरणादायी ठरणार आहे. तांदळे हे युवा उद्योजक व लेखक असून त्यांनी ‘रावण राजा राक्षसांचा’ व ‘द आंत्रप्रन्योर’ या बहुचर्चित व प्रचंड गाजलेल्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत. युवकांनी ही संधी दवडू नये, असे आवाहन संयाेजकांनी केले आहे.