तुम्ही नारळ फोडा, उमेदवारी मला मिळो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:32 IST2021-08-17T04:32:21+5:302021-08-17T04:32:21+5:30
सांगली : विनोदी चिमटे काढण्याचे कसब, हजरजबाबीपणा असलेल्या राजकारण्यांची सांगलीला परंपरा लाभली आहे. नव्या पिढीतही हे कौशल्य विकसित झाले ...

तुम्ही नारळ फोडा, उमेदवारी मला मिळो
सांगली : विनोदी चिमटे काढण्याचे कसब, हजरजबाबीपणा असलेल्या राजकारण्यांची सांगलीला परंपरा लाभली आहे. नव्या पिढीतही हे कौशल्य विकसित झाले आहे. सांगलीतील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये अशीच विनोदी जुगलबंदी रंगली. पालकमंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रसंग घडत असल्याने त्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही उडी घेतली.
सांगलीतील नेमिनाथ नगर येथे एका चिल्ड्रन पार्कचे उद्घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते पार पडले. जयंत पाटील यांनी यावेळी नारळ फोडण्याचा पहिला मान काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना दिला. त्यानंतर लगेचच काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी त्यांच्या या संधीवर चिमटा काढला. ‘सर्व कार्यक्रमांचे नारळ त्यांनाच फोडायला मिळोत, पण उमेदवारी मला मिळो’. यावर उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ झाला. या चिमट्याला तितक्याच हजरजबाबीपणाने पृथ्वीराज पाटील यांनी उत्तर दिले. ‘उमेदवारी त्यांनाच मिळणार आहे, पण लोकसभेची’. या त्यांच्या वाक्यावर हास्यकल्लोळ आणखी वाढला.
दोन्ही नेत्यांच्या जुगलबंदीचा आनंद जयंत पाटील यांच्या चेहऱ्यावरील हास्याने स्पष्ट दिसत होता. यावर गप्प बसतील ते राष्ट्रवादी पदाधिकारी कसले. यात राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी उडी घेत ‘या जागेवर आता आम्ही दावा करु’, असे सांगत दोन्ही नेत्यांची गंमत केली.
चौकट
सुप्त संघर्षाची कहाणी
गत सांगली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी मिळाली होती. त्यांना अल्प मताने पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे सांगली लोकसभा मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. आता विशाल पाटील यांच्या समर्थकांनी त्यांना विधानसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे या जागेसाठी सध्या काँग्रेसमध्ये छुपा संघर्ष सुरु आहे.
चौकट
राष्ट्रवादी-काँग्रेसमध्येही दावेदारी
दोन्ही काँग्रेस जेव्हा एकत्र येतात, तेव्हा सांगली विधानसभेच्या जागेसाठी दोन्ही पक्षांकडून दावेदारी केली जाते. अनेकदा राष्ट्रवादीनेही या जागेवरुन निवडणूक लढवली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांतही जागेवरुन संघर्ष आहे.