येळापूर ग्रामपंचायत आता ‘एका क्लिकवर’
By Admin | Updated: August 28, 2015 23:04 IST2015-08-28T23:04:53+5:302015-08-28T23:04:53+5:30
प्रत्येकाचे डिजिटल लॉकर उघडणार : जिल्ह्यातील पहिलीच डिजिटल ग्रामपंचायत

येळापूर ग्रामपंचायत आता ‘एका क्लिकवर’
शिवाजी पाटील -येळापूर (ता. शिराळा) ग्रामपंचायतीने स्वत:ची वेबसाईट तयार केली असून ग्रामपंचायतीकडील सर्व प्रकारची माहिती दाखले, कागदपत्रे, कुणालाही आणि कुठेही मिळणार असून अल्पावधित प्रत्येक व्यक्तीचे ‘डिजिटल लॉकर’ उघडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अशा प्रकारची सेवा देणारी जिल्ह्यातील ही पहिलीच ग्रामपंचायत असल्याची माहिती सरपंच सौ. सुरेखा लोहार व ग्रामसेवक संदीप खैर यांनी दिली.
येळापूर हे साडेचार हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. सध्या ग्रामपंचायतीत अकरा सदस्य कार्यरत असून ही ग्रामपंचायत दहा वाड्या-वस्त्या व एक गाव अशी मिळून बनली आहे. गावाला उच्चशिक्षित ग्रामसेवक लाभले असल्यामुळे ग्रामसेवकांनी सर्व सदस्यांसह, ग्रामस्थांना एकत्र आणून शासनाच्या सर्व योजना राबविण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचबरोबर सर्व अभियाने राबवून त्यात सातत्य ठेवण्याचे काम करीत आहे.
गेल्या एक वर्षापासून प्रत्येकाला ग्रामपंचायतीत येऊन माहिती, दाखले यासारख्या कागदपत्रांसाठी हेलपाटे मारावे लागू नयेत याची दखल घेत, सरपंचांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक संदीप खैर यांनी ग्रामपंचायतीची वेबसाईट तयार करुन ग्रामपंचायतीकडील ग्रामसभा, मासिक सभा इतिवृत्त, ग्रामपंचायतीचे सर्व रेकॉर्ड, शासनाच्या योजना, आजपर्यंतचे लाभार्थी, दारिद्र्यरेषेची यादी, सर्व प्रकारचे दाखले यासारखी माहिती उपलब्ध करुन दिली आहे. कोणीही व्यक्ती त्याची माहिती घेऊ शकतो. तशी व्यवस्थाही यावर करण्यात आली आहे.
सर्व दाखले, घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्ती याचीही माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीने प्रत्येक कुटुंबातील सदस्याचे बँकेच्य्या लॉकरप्रमाणेच ‘डिजिटल लॉकर’ तयार करण्याचे काम हाती घेतले असून, या डिजिटल लॉकर सुविधेमध्ये प्रत्येक व्यक्तीचे जन्म-मृत्यू दाखले, घराचे उतारे, शालेय प्रमाणपत्र, ओळखपत्रे, शिधापत्रिका यांसारखी आवश्यक कागदपत्रे संगणकीय लॉकरमध्ये स्कॅन करून ठेवण्यात येणार आहेत.
ग्रामपंचायतीने आपली सर्व माहिती वेबसाईटवर अपलोड केल्यामुळे, तसेच डिजिटल लॉकर व्यवस्थेमुळे सर्वसामान्यांचे प्रश्न, शंका सुटणार असून, होणारा त्रास कमी होणार आहे. यावेळी उपसरपंच सुभद्रा पाटील, अधिकारी यांनी ग्रामपंचायतीचे कौतुक केले.
सदस्य व्यक्तीला एक पासवर्ड दिला जाणार असून याच्या साहाय्याने आवश्यक त्या कागदपत्राची प्रत कुठेही काढता येणार आहे. त्यामुळे आवश्यक त्या ठिकाणी कागदपत्रे बरोबर घेऊन न जाता, एका क्लिकवर उपलब्ध होणार असून ग्रामपंचायतीकडे हेलपाटे मारण्याचा व्याप बंद होणार आहे. - सुरेखा लोहार, सरपंच, येळापूर ग्रामपंचायत
ग्रामपंचायतीची वेबसाईट तयार करुन ग्रामसभा, मासिक सभा इतिवृत्त, रेकॉर्ड, योजना, लाभार्थी, दारिद्र्यरेषेची यादी, सर्व प्रकारचे दाखले यासारखी माहिती उपलब्ध करुन दिली आहे.