भूविकास बँकेच्या कर्जमाफीकडे येळापूरच्या शेतकऱ्यांच्या नजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:28 IST2021-08-26T04:28:18+5:302021-08-26T04:28:18+5:30
कोकरुड : भू-विकास बँकेकडे असलेली थकबाकी माफ करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी शासनस्तरावर मोठ्या हालचाली सुरू आहेत. ही कर्जमाफी झाल्यास ...

भूविकास बँकेच्या कर्जमाफीकडे येळापूरच्या शेतकऱ्यांच्या नजरा
कोकरुड : भू-विकास बँकेकडे असलेली थकबाकी माफ करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी शासनस्तरावर मोठ्या हालचाली सुरू आहेत. ही कर्जमाफी झाल्यास येळापूर येथील सभासदांची भू-विकास बँकेकडे असलेली १५ कोटींची थकबाकी माफ होणार असल्याने सर्वांच्या नजरा शासन निर्णयाकडे लागल्या आहेत.
३० वर्षांपूर्वी म्हणजे १९९१ मध्ये येळापूरसह परिसरातील शेतीला पाणी मिळावे, येथील युवकांना रोजगार, महिलांच्या हाताला काम मिळून चार रुपये हातात यावेत, यासाठी विश्वास कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष लोकनेते फत्तेसिंगराव नाईक, संचालक शिवाजीराव घोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश उपसा जलसिंचन योजनेची स्थापना करण्यात आली. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे या संस्थेस कोणीही कर्ज देत नव्हते. यावेळी फत्तेसिंगराव नाईक यांनी शिराळा येथील भू-विकास बँकेच्या शाखेस विश्वास साखर कारखान्याचे हमीपत्र दिल्याने दहा वर्षांनंतर म्हणजे २००१ मध्ये प्रत्यक्ष ही योजना सुरू झाली. या योजनेसाठी २३२ सभासदांनी ६३० एकरवर कोट्यवधीचे कर्ज घेतले होते. कमी क्षेत्र लागवडीखाली असल्याने थकबाकी वाढत जाऊन ती १४ कोटी ७१ लाख ३० हजार झाली आहे. तारण ६३० एकर क्षेत्रापैकी ३०० एकर म्हणजे निम्मेच क्षेत्र लागवडीखाली असल्याने कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत चालला होता. महाविकास आघाडी सरकारने भू-विकास बॅंकेकडे असणाऱ्या सर्व कर्जदारांना कर्जमाफी देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे तीस वर्षांपासून असलेले १५ कोटी रुपये कर्ज माफ झाल्यास याचा फायदा सभासद, शेतकरी, गणेश उपसा जलसिंचन योजना यांना होणार आहे. येथील शेतकऱ्यांच्या नजरा शासन निर्णयाकडे लागल्या आहेत.