येळापूर, मेणीतील सहा बंधारे वाहून गेले
By Admin | Updated: September 13, 2015 00:18 IST2015-09-13T00:16:59+5:302015-09-13T00:18:09+5:30
कृषी विभागाकडूृन बांधकाम : चौकशी करुन कारवाईची मागणी

येळापूर, मेणीतील सहा बंधारे वाहून गेले
येळापूर : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील कृषी विभागामार्फत बांधण्यात आलेले सिमेंट बंधारे अल्प कालावधित वाहून गेल्याने शेतकऱ्यांना दुष्काळाला तोंड द्यावे लागत असून, या सर्व कामांची चौकशी करुन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य रणधीर नाईक यांच्याकडे केली.
यावेळी रणधीर नाईक यांनी येळापूर, मेणी, चरण, काळुंद्रे परिसरातील सिमेंट बंधारे, मातीचे बंधारे त्याचबरोबर पाझर तलावाची पाहणी केली. येळापूर, मेणी, सावंतवाडी, रांजणवाडी, शिरसटवाडी येथील सिमेंट बंधारे वाहून गेल्याचे, तर मातीचे बंधारे गाळाने भरले असून, शिरसटवाडी पाझर तलावाच्या गळतीबद्दल शेतकऱ्यांनी माहिती दिल्याने त्यांनी वरील सर्व ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. मेणी खोऱ्यामध्ये गत कालावधित सुमारे ६ सिमेंट बंधारे बांधण्यात आले होते. ते सर्व बंधारे वाहून गेलेले आहेत. बांधलेले सर्व बंधारे वाहून जाणे धक्कादायक असल्याचे या ठिकाणी पाहणी केली असता आढळून आले. बंधाऱ्याचे आवशेष पाहून निकृष्ट दर्जाचे काम झाले होते, हे यामुळे कळून आले आहे. या बंधाऱ्याची कामे चांगली झाली असती, तर त्याचा शेतकऱ्यांना निश्चित लाभ झाला असता. तर अनेक गाळ साठलेले मातीचे बंधारे दगडमातीने भरल्याने ऐन पावसाळ्यात या ठिकाणी एक थेंबही पाणी साठा होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी करुन उगवलेल्या पिकांना पाणी मिळाले नसल्याने लाखो रुपये अभियंता व अधिकारी यांच्या खिशात गेले. मात्र त्याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना कसलाही झाला नाही.
यावेळी मेणी खोऱ्यातील सर्व गावांमधील शेतकऱ्यांनी शेतीच्या पाण्याच्या समस्या मांडल्या, तर नाईक यांनी जलयुक्त शिवार योजनेतील जलसंधारणाच्या कामाबद्दल सविस्तर माहिती दिली.
यावेळी शेतकऱ्यांच्यावतीने आत्माराम सावंत, शिवाजी शिरसट, आत्माराम नेर्लेकर, खाशाबा पाटील, हरिबा शिरसट, अशोक कुंभार, आनंदराव वाघमारे, महादेव पाटील, शामराव पाटील, आकाराम निकम, मोहन आटुगडे यांनी अडचणी मांडल्या. यावेळी ग्लुकोजचे संचालक गजानन पाटील, सुभद्रा आटुगडे, दगडू सावंत, सरपंच संजय बेंगडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)