फोटो : सुरेंद्र दुपटे
शीतल पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : उत्सवप्रिय सांगलीकरांकडून श्रावण महिन्यात भक्तीरसाचा जागर केला जातो. या महिन्यात उत्सवांनाही उधाण आलेले असते. श्रावण सोमवारी तर हरिपूर, सागरेश्वरसह जिल्ह्यातील शिवालये भक्तांच्या गर्दीने फुललेली असतात. पण गतवर्षीपासून श्रावण महिन्यातील सणांना कोरोनाचे ग्रहण लागले आहे. यंदाही कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही. त्यामुळे श्रावण महिन्यात तरी मंदिरे उघडणार का? असा प्रश्न भक्तांना पडला आहे.
श्रावण महिन्यातील सोमवारी हरिपूर येथील संगमेश्वर मंदिर, सागरेश्वर मंदिरात भक्तांची गर्दी असते. प्रत्येक सोमवारी राज्यभरातून भाविक भगवान शंकराच्या दर्शनाला येतात. गतवर्षी लाॅकडाऊनमुळे मंदिरे बंद होती. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात ही मंदिरे खुली झाली. यंदा एप्रिलपासून मंदिरे पुन्हा कुुलूपबंद आहेत. त्यामुळे श्रावण सोमवारी भगवान शिवशंकराचे दर्शन होणार का? याची चिंता भाविकांना लागली आहे. जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती पाहता मंदिरे उघडण्याबाबत साशंकता आहे.
चौकट
व्यावसायिक म्हणतात...
हरिपूरच्या मंदिराबाहेर गेली ३५ वर्षे पूजेच्या साहित्य विक्रीचा व्यवसाय करतो. याच व्यवसायावर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. गेल्यावर्षी कोरोनामुळे मंदिर बंद झाले. त्यामुळे व्यवसायही बंद झाला. अखेर भाजीपाला विकून चरितार्थ चालवावा लागला. यंदा श्रावणात मंदिर उघडेल, अशी आशा आहे. उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट झाल्याने आता शासनानेच छोट्या व्यावसायिकांना आर्थिक मदत करण्याची गरज आहे. - शंकर कोळी
चौकट
सागरेश्वर मंदिराबाहेर बऱ्याच वर्षांपासून पूजा साहित्याची विक्री करतो. सागरेश्वरला श्रावणात राज्यभरातून भाविक येतात. त्यावरच कुटुंब चालते. वर्षभरापासून व्यवसाय बंद आहे. सध्या आजूबाजूच्या गावात फिरून साहित्य विक्रीचा व्यवसाय करत आहे. - राजेंद्र महिंद
चौकट
९ पासून श्रावण
दि. ९ ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत आहे. पहिलाच दिवस सोमवार आहे. महिन्यात पाच श्रावण सोमवार आहेत. याशिवाय नागपंचमी, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी असे महत्त्वाचे सणही याच महिन्यात येतात. पण गेल्या वर्षभरापासून या सण, उत्सवांवर कोरोनाचे संकट आहे. यंदाही हे संकट दूर होण्याची शक्यता कमीच आहे.