यावर्षी दहावीच्या सर्वच शाळांचा निकाल शंभर नंबरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:19 IST2021-06-01T04:19:58+5:302021-06-01T04:19:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : अखेर बऱ्याच वाटाघाटीनंतर आणि कायद्याचा कीस पाडल्यानंतर दहावीचे मूल्यांकन निश्चित झाले. शासनाने मूल्यांकनाची जबाबदारी ...

यावर्षी दहावीच्या सर्वच शाळांचा निकाल शंभर नंबरी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : अखेर बऱ्याच वाटाघाटीनंतर आणि कायद्याचा कीस पाडल्यानंतर दहावीचे मूल्यांकन निश्चित झाले. शासनाने मूल्यांकनाची जबाबदारी शाळांवर सोपवली आहे, त्यामुळे सर्रास शाळांचा निकाल शंभर टक्के लागणार हे जवळपास निश्चित झाले आहे. गुणवंतांचा महापूरही येणार आहे.
दहावीची परीक्षा म्हणजे शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा असतो. बोर्डाच्या परीक्षेचा हा रोमांचही वेगळाच असतो. यंदा दहावीचे विद्यार्थी हा रोमांच अनुभवू शकणार नाहीत. बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी. या पारंपरिक शिक्षणक्रमांना प्रवेश घेणारे विद्यार्थी तर आयुष्यभरात हा रोमांच कधीच अनुभवू शकणार नाहीत. मूल्यांकनाच्या निर्णयाचे शिक्षणतज्ज्ञांनी स्वागत केले आहे. दहावीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर कोणतीही परीक्षा न घेता, विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे अव्यवहार्य असल्याचे त्यांचे मत होते. आता शासनाने मूल्यांकनाचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांची क्षमता स्पष्ट होणार आहे. शिवाय पुढील प्रवेशावेळी गुणवंतांवर अन्यायही होणार नाही.
मूल्यांकनाची जबाबदारी शाळांवर सोपवल्याने उत्तीर्णांची संख्या प्रचंड वाढण्याचा अंदाज आहे. मूल्यांकनाची फेरतपासणी नमुना स्वरुपात होणार असली, तरी तो फक्त एक उपचारच ठरणार आहे. विद्यार्थ्यांची खरी परीक्षी सीईटीवेळीच असेल. व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी सीईटीला सामोरे जावे लागेल. त्यामुळे दहावी परीक्षेसाठी अभ्यास केला नाही तरी सीईटीसाठी मात्र पुस्तके उघडावीच लागणार आहेत. शिक्षणतज्ज्ञांनी व पालकांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
पॉईंटर्स
१. दहावी परीक्षेसाठी जिल्ह्यात नोंदणी केलेले विद्यार्थी - ४०,८४४
मुले - २२,८७०
मुली - १७,९७४
बॉक्स
असे असेल नवे सूत्र
- प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मूल्यमापन. दहावीच्या वर्षातील अंतर्गत लेखी मूल्यमापन ३० गुण, गृहपाठ, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा यांना २० गुण, नववीचे विषयनिहाय अंतिम निकाल ५० गुण या आधारे यंदाचे मूल्यमापन होईल. विद्यार्थ्यांची कोविड पूर्वकाळातील संपादणूक पातळीही विचारात घेतली जाईल.
- निकाल समाधानकारक वाटला नाही तर भविष्यात प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार परीक्षा देता येईल. जूनअखेर निकाल लागेल. निकालासाठी शाळास्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची निकाल समिती असेल. याची पडताळणी विभागीय शिक्षणाधिकारी करतील. गैरप्रकार, शिस्तभंग झाल्यास दंडात्मक कारवाई होईल.
कोट
अशा संकटांसाठी तयार राहायला हवे
शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन झालेच पाहिजे, अन्यथा गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. आता मूल्यांकनावेळी शाळांची परीक्षा असेल. व्यावसायिक शिक्षणक्रमासाठी सीईटीचा निर्णयदेखील स्वागतार्ह आहे. भविष्यात अशी संकटे येतच राहणार आहेत, त्यांना तोंड देण्यासाठीही शासनाने तयार राहायला हवे.
- नामदेव माळी, सांगली
अकरावीसाठी ऐच्छिक सीईटीचा निर्णय योग्य आहे. यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. सीईटीसाठी दहावीतील विद्यार्थी अभ्यास सुरू करतील. दहावीच्या गुणपत्रिकेत नववीच्या गुणांचाही संदर्भ असेल, त्यामुळे गुणवत्तेची प्रामाणिक पारख होईल. मूल्यांकनासाठीचे सर्व रेकॉर्ड बोर्डाकडे असल्याने पारदर्शकता राहील. त्याची प्रत पालकांना व विद्यार्थ्यांना पाहता येईल. कोणतीही परीक्षा किंवा मूल्यांकन न होता दहावीत उत्तीर्ण करणे योग्य ठरले नसते.
- प्रा. रवींद्र फडके, मिरज
दहावीतील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होणार असले तरी सीईटीमुळे हुशार व अभ्यासू विद्यार्थ्यांना न्याय मिळणार आहे. पण दहावीच्या विषयांचे मूल्यांकन कसे करणार, हे नेमके स्पष्ट व्हायला हवे. गेल्या वर्षभरात दहावीचे प्रत्यक्ष वर्ग झालेच नाहीत, त्यामुळे गुण निश्चित करताना शाळांचीही कसोटी लागेल. पारदर्शकता व विद्यार्थ्यांचे भवितव्य डोळ्यासमोर ठेवून मूल्यांकन होईल, याकडे बोर्डाने लक्ष ठेवायला हवे.
- प्रा. गणेश जोशी, सांगली
चौकट
पालक म्हणतात, बरे झाले मूल्यमापन केले
कोणतेही मूल्यमापन न करता मुलांना दहावी उत्तीर्ण केले असते तर त्याची क्षमता समजली नसती. आता नववीच्या गुणांपासून क्षमता जोखली जाणार आहे, त्यामुळे किमान त्यांची बौद्धिक पातळी स्पष्ट होईल. पुढील शिक्षणक्रमासाठी कोणती शाखा निवडायची, याचा निर्णय घेणे आम्हाला शक्य होईल. शाळा बंद असतानाही ऑनलाईन वर्गांना प्रामाणिकपणे हजर राहिलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल.
- नितीन काळे, पालक, मिरज
अंतर्गत मूल्यमापन करताना पारदर्शकता राहील, याची काळजी शाळांनी घ्यावी. १०० टक्के निकाल लावण्याच्या प्रयत्नात सरसकट विद्यार्थ्यांना गुणांची खिरापत वाटू नये. वर्षभर विद्यार्थी शिक्षकांपुढेच असल्याने त्यांना गुणवंत विद्यार्थ्यांची पारख असते. त्याचा कस लावूनच गुणदान करावे.
- विशाल दाणेकर, पालक, माधवनगर.
चौकट
बोर्ड परीक्षा नसल्याचा आनंद
वर्षभर ऑनलाईन वर्गात अभ्यास पुरेसा झाला नव्हता. गेल्या काही महिन्यात अभ्यास केला असला तरी बोर्डाच्या परीक्षेचा अनुभव नव्हता. आता अंतर्गत मूल्यांकनामुळे बोर्डाची परीक्षा टळली आहे. त्यामुळे विद्यार्थी खुश आहेत. परीक्षेची तयारी केली होती, पण अंतर्गत मूल्यांकनात उत्तीर्ण होणार असल्याची हमी मिळाली आहे, त्यामुळेही विद्यार्थी निर्धास्त झाले आहेत. पण बोर्ड परीक्षेच्या अविस्मरणीय अनुभवपासून मात्र ते वंचित राहणार आहेत. व्यावसायिक वगळता अन्य शिक्षणक्रमांना बोर्ड परीक्षा नसतात, त्यामुळे पारंपरिक शिक्षण घेणारे विद्यार्थी आयुष्यात कधीच बोर्ड परीक्षेचा रोमांच अनुभवू शकणार नाहीत.
चाैकट
पुढील प्रवेश असा होईल
अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित वैकल्पिक सीईटी होईल. या १०० गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न आणि ओएमआर पद्धतीने दोन तासांची परीक्षा घेण्यात येईल. सीईटीच्या आधारे कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश होईल. सीईटीतील गुणांच्या आधारे अकरावीसाठी प्रवेशाला प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर रिक्त जागा राहिल्यास त्या सीईटी परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुल्या राहतील.