यशवंतरावांचे स्मारक प्रेरणास्थान बनेल
By Admin | Updated: June 27, 2014 01:02 IST2014-06-27T01:00:18+5:302014-06-27T01:02:15+5:30
शरद पवार : देवराष्ट्रेत स्मारकाचे उद्घाटन

यशवंतरावांचे स्मारक प्रेरणास्थान बनेल
सांगली/देवराष्ट्रे : सामान्य कुटुंबातही कर्तृत्ववान माणसं जन्माला येऊ शकतात, ही गोष्ट यशवंतरावांच्या जन्मघराकडे पाहिल्यानंतर लक्षात येते. त्यामुळे हे स्मारक महाराष्ट्रातील आणि बाहेरील तरुणांसाठी प्रेरणास्थान बनेल, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी गुरुवारी देवराष्ट्रे येथील कार्यक्रमात व्यक्त केला.
देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मघर स्मारकाचे उद्घाटन गुरुवारी पवार यांच्याहस्ते करण्यात आले. स्मारक लोकार्पण सोहळ््यास सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, गृहमंत्री आर. आर. पाटील, पालकमंत्री पतंगराव कदम, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री संजय सावकारे, जलसंपदामंत्री (कृष्णा खोरे महामंडळ) शशिकांत शिंदे, खा. सुप्रिया सुळे उपस्थित होते.
पवार म्हणाले की, यशवंतरावांच्या नावे विविध संस्था उभारण्यात आल्या. या लोकोपयोगी संस्थांनी त्यांच्या स्मृती जपल्या आहेत. मुंबईतील यशवंतरावांचे स्मारक व प्रतिष्ठानच्या उभारणीत वसंतदादांनी पुढाकार घेतला होता. यशवंतरावांनी राज्यासाठी व देशासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहण्यासारखे आहे. प्रशासकीय सेवेचा अनुभव त्यांना होता. त्यामुळे प्रशासक आणि प्रशासन यांना मानवी चेहरा असायला हवा, म्हणून त्यांनी प्रयत्न केले. संसदेत काम करताना संसदीय कामकाजाची पथ्ये पाळण्याची खबरदारी घेणारे ते नेते होते. नेते अनेक होऊन जातात, पण कायमस्वरुपी आपला ठसा उमटविणारे कर्तृत्ववान लोक फार कमी असतात. कृष्णाकाठच्या मातीने अनेक कर्तृत्ववान माणसं जन्माला घातली. यात यशवंतरावांचे कार्य देशाला दिशादर्शक आहे. औद्योगिक, शेती, सहकार, शिक्षण, सामाजिक परिवर्तन अशा सर्वच क्षेत्रांना त्यांनी नवी दिशा दिली.
सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनीही यशवंतरावांच्या अनेक आठवणी सांगितल्या.
गृहमंत्री आर. आर. पाटील म्हणाले, लोकोत्तर पुरुष म्हणून यशवंतरावांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे. या मातीने मोठी माणसं जन्माला घातली ही गोष्ट खरी असली तरी, हयातीत त्यांना तो मोठेपणा मिळाला नाही. त्यांना अपमान सहन करतानाच संघर्षही करावा लागला. यशवंतराव पंतप्रधानपदापर्यंत पोहोचू शकले नाहीत, याची खंत नेहमी सतावते.
पालकमंत्री कदम म्हणाले की, यशवंतरावांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सोनहिऱ्याचा हा परिसर विकसित करण्याचा निर्धार शासनाने केला होता. यातील बरीच कामे पूर्ण झाली आहेत.
जयंत पाटील म्हणाले की, यशवंतरावांच्या पाऊलखुणांनी सोनहिऱ्याची भूमी सजली आहे. या परिसराच्या विकासाची कल्पना आता सत्यात उतरत आहे. कार्यक्रमास
आ. विक्रमसिंह पाटणकर,
आ. मानसिंगराव नाईक, बाळासाहेब पाटील, पृथ्वीराज देशमुख, प्रतिष्ठानचे कार्यक्रम संयोजक दत्ता सराफ उपस्थित होते. (प्रतिनिधी)