यशवंतरावांच्या जन्मघर स्मारकाचे आज उद्घाटन

By Admin | Updated: June 26, 2014 00:26 IST2014-06-26T00:20:43+5:302014-06-26T00:26:56+5:30

दिग्गज मंत्र्यांची उपस्थिती : सह्याद्रीचे वारे जनआवृत्तीचेही प्रकाशन

Yashwantrao's birthplace memorial inaugurated today | यशवंतरावांच्या जन्मघर स्मारकाचे आज उद्घाटन

यशवंतरावांच्या जन्मघर स्मारकाचे आज उद्घाटन

कडेगाव/देवराष्ट्रे : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे गुरुवारी यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मघर स्मारकाचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते दुपारी चार वाजता होणार आहे. यावेळी ‘सह्याद्रीचे वारे’ या यशवंतराव चव्हाण यांच्या भाषण संग्रहाच्या जनआवृत्तीचे प्रकाशनही होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील, पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची उपस्थिती आहे.
यशवंतरावांच्या जन्मशताब्दी वर्षात शासनाने कोट्यवधी रुपयांची विकासकामे देवराष्ट्रे येथे मंजूर केली. ही कामे अद्यापही सुरू आहेत. अनेक कामे पूर्णत्वास आली आहेत. यामुळे देवराष्ट्रे आता ‘यशवंतमय’ झाले आहे.
देवराष्ट्रे येथील यशवंतरावांचे जन्मघर पुनरुज्जीवित करून त्याचे स्मारकात रूपांतर झाले आहे. स्मारकातील सहा खोल्यामध्ये दालन तयार केली आहेत. घराच्या अत्यंत कमी जागेत छायाचित्रे व चित्ररूपाने त्यांची कारकीर्द दाखविली आहे. यशवंतरावांचे विचारधन लोकांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने घराच्या स्वागत कक्षात त्यांची पुस्तके, भाषणसंग्रह, भाषणाच्या सीडी उपलब्ध करून दिल्या आहेत.
हे जन्मघर पुरातत्त्व विभागाकडे होते. परंतु त्यांनी या जन्मघराची व्यवस्था अपेक्षेप्रमाणे होणार नाही, असे कळविले. यावर राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाने २००७ मध्ये महाराष्ट्र वैभव संगोपन योजना सुरू केली. या योजनेंतर्गत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांनी या जन्मघराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मागितली. यावर राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या तज्ज्ञ सल्लागार समितीच्या शिफारशीने ११ मार्च २०१४ करार झाला आणि या जन्मघराची जबाबदारी प्रतिष्ठानकडे आली.
कोल्हापूर येथील गजबर अ‍ॅड असोसिएट्स यांनी प्रतिष्ठानच्यावतीने यशवंतरावांचे जन्मघर कसे दिसेल, याचे सादरीकरणही शासनाच्या तज्ज्ञ समितीसमोर केले होते. या सर्व घडामोडीनंतर या जन्मघराचा ताबा प्रतिष्ठानकडे आला. आता हे जन्मघर यशवंतरावांचा चालता-बोलता इतिहास दर्शवित आहे. (वार्ताहर)

Web Title: Yashwantrao's birthplace memorial inaugurated today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.