शिराळा पश्चिममध्ये रताळे पीक जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:30 IST2021-08-24T04:30:33+5:302021-08-24T04:30:33+5:30
सहदेव खोत लोकमत न्यूज नेटवर्क पुनवत : शिराळा तालुक्याच्या डोंगराळ भागात लागवड केलेले रताळ्याचे पीक जोमात असल्याचे चित्र सध्या ...

शिराळा पश्चिममध्ये रताळे पीक जोमात
सहदेव खोत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुनवत : शिराळा तालुक्याच्या डोंगराळ भागात लागवड केलेले रताळ्याचे पीक जोमात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. व्यापारी तत्त्वावर घेतलेली ही पिके शेतकऱ्यांना फायद्याची ठरत आहेत.
शिराळा व शाहूवाडी तालुक्याच्या भागात प्रतिवर्षी शेतकरी कंदमूळ प्रकारातील रताळ्याचे पीक घेतात. साधारणपणे जून महिन्यात रताळी वेलांचे शेतात रोपण केले जाते. शेतात सऱ्या पाडून हे पीक घेतले जाते. लागणीपूर्वी सेंद्रिय खत टाकले जाते. साधारणपणे तीन महिन्यानंतर ही रताळी काढणीस येतात. डोंगर भागातील शेतकरी यासाठी परिश्रम घेतात.
सध्या जागोजागी ही पिके चांगलीच बहरलेली दिसत आहेत. दिवाळीच्या दरम्यान या पिकाचा सुगीचा हंगाम सुरू होतो. शेत नांगरून या पिकाची काढणी केली जाते. शेतकरी तयार रताळी धुऊन बाजारपेठेत पाठवतात, तर काही शेतकरी गावोगावी फिरून ती विकून अर्थार्जन करतात. अलीकडे या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. खासकरून माळाच्या शेतात ही पिके बहरलेली दिसत आहेत.
चौकट
शहरांतील बाजारपेठांत मागणी
श्रावणात आणि गणेशोत्सवानंतर तुळशीविवाहापर्यंत मुंबई, वाशी, पुणे व कोल्हापूर बाजारपेठांमध्ये रताळांना मोठी मागणी असते. रताळे पिकातून मोठी आर्थिक उलाढाल होते. काढणीच्या हंगामात बाजारपेठांतील काही व्यापारी थेट बांधावर येऊन रताळी खरेदी करतात. रताळांना २० ते ४० रुपयांपर्यंत प्रतिकिलो दर मिळतो.