जतमध्ये यल्लम्मा देवीच्या यात्रेस प्रारंभ
By Admin | Updated: December 19, 2014 00:22 IST2014-12-18T22:20:08+5:302014-12-19T00:22:17+5:30
लाखो भाविक दाखल : दर्शनासाठी स्वतंत्र दोन रांगांची व्यवस्था

जतमध्ये यल्लम्मा देवीच्या यात्रेस प्रारंभ
जत : पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या जत येथील यल्लम्मादेवी यात्रेस आज गंधओटी कार्यक्रमाने प्रारंभ झाला. आज (गुरुवार) पहाटेपासून लिंब नेसणे व दंडवत घेणे या कार्यक्रमास भाविकांनी सुरुवात केली. त्यामुळे मंदिर परिसरात गर्दी झाली होती. देवस्थान समितीने स्वतंत्र दर्शन रांगा तयार करून भाविकांना मंदिराच्या गाभाऱ्यात उभे राहून दर्शन घेण्याची व्यवस्था केली आहे. यामुळे भाविकांना सुलभ दर्शन घेता येत आहे.
यल्लम्मादेवी मंदिरापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर बांधीव कुंड तयार करून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र गंध घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस लिंब नेसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेत व्यापारी, व्यावसायिक व फिरते विक्रेते यांची सुमारे दोन हजार पाचशे इतकी संख्या झाली आहे. भाविक, व्यापारी व व्यावसायिकांच्या सेवेसाठी पाच ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, चार ठिकाणी तात्पुरते शौचालय, वीज पुरवठा आदी व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रा कालावधित कोणत्याही साथीच्या रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून पाण्यात जंतुनाशक मिसळले जात आहे. याशिवाय तात्पुरते प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करून तेथे एक रुग्णवाहिका आणि वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रवासी भाविकांना ये-जा करता यावे यासाठी यात्रेत एसटी बसस्थानक सुरू करण्यात आले आहे. यात्रा कालावधित कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलीस व मंदिर परिसरात कॅमेरे बसवून त्यातील हालचालींवर नियंत्रण ठेवले जात आहे.
याशिवाय जत शहरातील वाचनालय चौक ते छत्रीबागपर्यंतच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये म्हणून तेथे एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. यात्रेतील गैरसोय अथवा इतर माहितीसंदर्भात भाविकांनी यात्रा समिती कार्यालयात संपर्क साधावा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन यल्लम्मादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांनी केले आहे. (वार्ताहर)