कुडनूरमध्ये यादवकालीन शिलालेख आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:51 IST2021-03-04T04:51:08+5:302021-03-04T04:51:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जत तालुक्यातील कुडनूर येथे यादवकालीन हळेकन्नड लिपीतील शिलालेख मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक गौतम ...

An Yadav inscription was found at Kudnur | कुडनूरमध्ये यादवकालीन शिलालेख आढळला

कुडनूरमध्ये यादवकालीन शिलालेख आढळला

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जत तालुक्यातील कुडनूर येथे यादवकालीन हळेकन्नड लिपीतील शिलालेख मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक गौतम काटकर व मानसिंगराव कुमठेकर यांना आढळून आला. या शिलालेखात सिंगणापूर गावातील सादेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि सिंगणेश्वर या तीन देवांना जमीन दान दिल्याचा उल्लेख आहे. पाच वर्षांपूर्वी या संशोधकांनी याबाबत संशोधन केले आहे. हा लेख मारुती मंदिराशेजारील रस्त्याशेजारी भंगलेल्या अवस्थेत होता.

जत तालुक्याला प्राचीन इतिहास आहे. तालुक्यात यापूर्वी चालुक्यकालीन आणि यादवकालीन काही शिलालेख आढळले आहेत. या शिलालेखांवरुन जत तालुक्याच्या सुमारे एक हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासावर प्रकाश पडतो. मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या अभ्यासकांना जत आणि कवठेमहांकाळ तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कुडनूर गावी मारुती मंदिराच्या पश्चिम बाजूस असलेल्या रस्त्यालगत शिलालेख आढळून आला.

कुडनूर येथील बाळासाहेब मासाळ, संतोष पांढरे, सतीश पांढरे, नायकू सुतार, सुभाष पांढरे यांनी हा शिलालेख गावात असल्याची माहिती प्रा. काटकर आणि कुमठेकर यांना पाच वर्षांपूर्वी दिली होती. या शिलालेखाचे दोन भाग झाले होते. यावर वरच्या बाजूला गाय, सूर्य-चंद्र व शस्त्र अशी चित्रे कोरली आहे. काटकर आणि कुमठेकर यांनी हे लेख उतरुन घेऊन त्याचे वाचन तज्ज्ञांकडून करवून घेतले. या शिलालेखात एकूण नऊ ओळी असून, वरील बाजूस चार अस्पष्ट अक्षरे आहेत. या लेखात सिंगणापूर येथील श्री सादेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि सिंघणेश्वर या तीन देवांना बागायत जमीन दान दिल्याचा उल्लेख आहे.

सध्याच्या कुडनूरजवळच सिंगणापूर नावाचे गाव असून, या गावात असलेल्या महादेवाच्या तीन स्थानांचा उल्लेख या लेखात आहे. मात्र, सध्या अशा नावांची कोणतीही मंदिरे या दोन्ही गावात नाहीत. अक्षरांच्या वळणावरुन आणि लिपीवरून हा लेख उत्तर यादव काळातील असावा. या लेखात सिंघणेश्वर असा उल्लेख केला आहे. कदाचित तो यादवराजा सिंघण याच्या नावावरुन स्थापन केलेल्या मंदिराचे असावे. जत तालुक्यात सिंघणहळ्ळी आणि सिंगणापूर अशी गावांची नावे आढळतात. तीही यादवराजा सिंघण याच्या नावावरूनच असावीत.

गावच्या हद्दीत लेख

कुडनूर हे गाव दोन ओढय़ांच्या संगमावर वसले आहे. पूर्वी ते तेथून थोडय़ा अंतरावर होते. त्याला पांढरीचे रान म्हणतात. याच गावाजवळ सिंगणापूरलगत संबंधित तीन मंदिरांना जमीन दिली असल्याने हा शिलालेख कुडनूर गावाच्या हद्दीत आला असावा.

Web Title: An Yadav inscription was found at Kudnur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.