निवृत्त जवानाने उभारला कुस्ती आखाडा

By Admin | Updated: June 13, 2016 00:11 IST2016-06-12T23:02:01+5:302016-06-13T00:11:21+5:30

मल्लांची सोय : वारणानगरात ६० लाखांची इमारत

Wrestling Akhada set by retired youth | निवृत्त जवानाने उभारला कुस्ती आखाडा

निवृत्त जवानाने उभारला कुस्ती आखाडा

ऐतवडे बुद्रुक : देशभक्त पिढी घडविण्यासाठी युवक सुदृढ व निरोगी असणे अत्यंत गरजेचे आहे व त्यासाठी त्यांना तालीम मिळणे गरजेचे आहे. हे ओळखूनच कायम सामाजिक उपक्रमात आघाडीवर असणारे सेवानिवृत्त सैनिक आनंदराव सरनाईक ऊर्फ फौजीबापू यांनी वारणानगर (जि. कोल्हापूर) येथे मोक्याच्या ठिकाणी असलेल्या कोट्यवधी रुपये किमतीच्या जागेवर ५0 ते ६0 लाख रुपये खर्च करुन हा अत्याधुनिक व प्रशस्त असा कुस्ती आखाडा (तालीम) उभारला आहे.
मूळचे चिकुर्डे (ता. वाळवा) येथील, परंतु वारणानगर (जि. कोल्हापूर) येथे स्थायिक असलेले निवृत्त सैनिक आनंदराव सरनाईक ऊर्फ फौजीबापू हे एक वेगळेच व्यक्तिमत्त्व आहे. जवानीत देशाची सेवा केली. सैन्यातील सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपली देशभक्ती जराही कमी होऊ दिली नाही. त्यासाठी त्यांनी विविध सामाजिक उपक्रम सुरु केले. त्याचबरोबर सशक्त पिढी निर्माण होण्यासाठी वारणानगर येथे मोक्याच्या ठिकाणी असलेल्या कोट्यवधी रुपये किमतीच्या जागेवर स्वत:चे पन्नास ते साठ लाख रुपये खर्च करुन अत्याधुनिक व प्रशस्त कुस्ती आखाडा (तालीम) बांधला आहे. या तालमीत सध्या पुणे, सोलापूरसह परिसरातील २५ ते ३0 लहान—मोठे मल्ल सराव करीत आहेत. या मल्लांना सकस आहार ते स्वत: पुरवित आहेत. तसेच त्यांना सशक्त होण्यासाठी देशी गाईचे ताजे दूध मिळावे, यासाठी तालमीशेजारी देशी गार्इंचा गोठा उभारला आहे. लहानपणापासूनच त्यांना कुस्तीचे वेड आहे. त्यातूनच त्यांनी वारणानगर येथे श्री पंचमुखी हनुमान कुस्ती व क्रीडा संघाची स्थापना केली आहे. तालमीमध्ये दीडशेहून अधिक मल्ल तयार व्हावेत यासाठी ते विशेष प्रयत्न करत आहेत.
या तालमीत मुलांबरोबरच मुलींनाही कुस्तीचे प्रशिक्षण देण्याचा त्यांचा मानस आहे. त्याचबरोबर बॉक्सिंग, शरीरसौष्ठव, गोळाफेक अशा ताकदीच्या तसेच सर्व आधुनिक खेळांच्या सरावाकरिता आखाड्याची व इमारतीची उभारणी केली आहे. लहान मुला—मुलींपासून कुस्ती व खेळाची आवड असणाऱ्या सर्वांसाठी येथे अत्याधुनिक सोय केली आहे. तसेच बाहेरगावच्या इच्छुकांसाठी येथे सर्व माध्यमांचे शिक्षण व राहण्याची देखील उत्तम सोय आहे. तरी परिसरासह महाराष्ट्रातील इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आनंदराव सरनाईक यांनी केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Wrestling Akhada set by retired youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.