‘त्या’ पैलवानाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:27 IST2021-04-07T04:27:15+5:302021-04-07T04:27:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गरिबीच्या खाईत लोटलेल्या कुटुंबाला बाहेर काढण्याचे, खाकी वर्दी अंगावर मिरवित सेवा करण्याचे आणि समाजात ...

‘त्या’ पैलवानाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गरिबीच्या खाईत लोटलेल्या कुटुंबाला बाहेर काढण्याचे, खाकी वर्दी अंगावर मिरवित सेवा करण्याचे आणि समाजात मानाने जगण्याचे स्वप्न घेऊन कर्करोगाशी झुंजणारा सांगलीतील पैलवान अविनाश हजारेची लढत अखेर त्याच्या अखेरच्या श्वासाला थांबली.
गरिबीच्या अंध:कारात चाचपडत असतानाच लहानपणीच त्याचे पितृछत्र हरपले. मोठ्या भावाला अपंगत्व आले आणि घरच्या जबाबदारीचे मोठेसे गाठोडे डोईवर घेऊन त्याची धडपड सुरू होती. गरिबीने दिलेला त्रास सोसताना त्याला कर्करोगाने गाठले.
सांगलीच्या अहिल्यानगर येथे राहणाऱ्या अविनाश राजू हजारे या तरुणाची ही कहाणी समाजातील माणुसकीचे रितेपण स्पष्टपणे दाखवून देणारी आहे. गरिबीतून बाहेर पडण्यासाठी त्याने कला शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पोलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगून तो व्यायाम शाळेत, क्रीडांगणावर कसरत करीत राहिला. पहिल्याच प्रयत्नात तो थोड्याच गुणांनी पोलीस भरतीत अनुत्तीर्ण झाला होता. तरीही त्याचे कष्ट सुरूच होते. मात्र, त्याला गरिबीपाठोपाठ कर्करोगानेही ग्रासले.
हॉजकिन लिम्फोमा या विचित्र कर्करोगाने त्याला ग्रासले होते. निदान झाल्यानंतर त्याने लगेचच महात्मा फुले आरोग्य योजनेतून किमोथेरपीचे उपचार घेतले. त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात त्याने हार्ड थेरपीसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मदत घेतली. मात्र, ही मदत तुटपुंजी ठरली. त्यात त्याचे पूर्ण उपचार होऊ शकले नाहीत. त्याचा आजार ९० टक्क्यांपर्यंत बरा झाला होता. तरी त्याला भविष्यात कधीही याचा सामना करावा लागू नये, म्हणून डॉक्टरांनी त्यास बोनमॅरो ट्रान्स्प्लांटचा (अस्थिमज्जा प्रत्यारोपण) सल्ला दिला होता. त्यासाठी त्याला ६ लाख रुपयांचा खर्च सांगितला होता. शासकीय योजनांचा लाभ घेतल्यामुळे त्याला मदतीचे दरवाजे बंद झाले होते. शस्त्रक्रियेसाठी इतके पैसे आणायचे कोठून, असा प्रश्न त्याला सतावत होता. दुसरीकडे डॉक्टरांनी त्याला कोणत्याही परिस्थितीत तातडीने ही शस्त्रक्रिया करण्यास सांगितले होते. अखेर प्रयत्नांची शिकस्त करून थकल्यानंतर अविनाशने अखेरचा श्वास घेतला. समाजाचे मदतीचे हात किती रिते आहेत, याची प्रचिती या घटनेने आली.
चौकट
कुटुंबावर मोठे संकट
अविनाशचा भाऊ हमाली करतो, तर आई एमआयडीसीमध्ये कामाला जाते. अविनाश त्यांच्यासाठी एकमेव आधार होता. तो कर्करोगातून बरा होऊन कुटुंबाला आधार देईल, असे कुटुंबीयांनी उराशी बाळगलेले स्वप्नही अविनाशच्या जाण्याने विरले.