फकिराचे क्रांतिकारकत्व अण्णा भाऊंच्या लेखणीतून जगाला दिसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:49 IST2021-03-04T04:49:32+5:302021-03-04T04:49:32+5:30

दलित महासंघाच्यावतीने नेर्ले येथील फकिरागडावर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे, रघुनाथ पाटील, विकास बल्लाळ आदी. ...

The world saw the revolutionary nature of Fakira through the writings of Anna Bhau | फकिराचे क्रांतिकारकत्व अण्णा भाऊंच्या लेखणीतून जगाला दिसले

फकिराचे क्रांतिकारकत्व अण्णा भाऊंच्या लेखणीतून जगाला दिसले

दलित महासंघाच्यावतीने नेर्ले येथील फकिरागडावर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे, रघुनाथ पाटील, विकास बल्लाळ आदी.

लोकमत न्यूज नेटवर्क

नेर्ले : नेर्ले (ता. वाळवा) येथील पश्चिमेला उभा असलेला फकिरागड हा वीर फकिराच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. क्रांतिकारक फकिराचं कर्तृत्व मोठं होतं. म्हणूनच तो अण्णा भाऊच्या लेखणीतून जगाला दिसला. अण्णा भाऊ आणि फकिरा हे दोघेही मानवतेचे प्रवाह असल्याचे मत दलित महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी व्यक्त केले.

नेर्ले येथील फकिरागडावरील वीर फकिरा यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील, महिला आघाडीच्या पुष्पलता सकटे, ज्येष्ठ पर्यावरणवादी विचारवंत अरुण चव्हाण, राज्य सरचिटणीस शंकरराव महापुरे, सांगली जिल्हा अध्यक्ष विकास बल्लाळ, राज्य कार्याध्यक्ष उत्तम चांदणे उपस्थित होते.

गडावर फकिरा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी रघुनाथ पाटील म्हणाले, माणसांचे देव करू नका. त्या काळात लढणारी माणसं आपली होती, आपल्या रक्ताची होती. त्यांनी समतेचा संदेश दिला. मताचा योग्य वापर करा. अर्थवादाच्या रूपाने मागासलेले आपले उद्योग अंबानी, टाटा यांनी सुरू केले. आपले व्यवसाय काढून घेतले. शेती काढून घेण्याचे प्रयत्न होतोय. या देशातील भावनिक विषयांवर बोलून आपणास उद्ध्वस्त करण्याचा डाव शासनाचा आहे. कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांनी माणसाला वाचवले.

अरुण चव्हाण म्हणाले, प्रस्थापितांचा विरोधक फकिरा होता. मार्क्स याचं तत्त्वज्ञान लोकांच्या ठायी पचविण्याची ताकद अण्णा भाऊ आणि शाहीर अमर शेख यांच्याकडे होती, त्यांचं योगदान महत्त्वाचे आहे.

यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा पुष्पलता सकटे, माजी सरपंच जयकर कदम, तालुका संघटक संतोष चांदणे, बाळासाहेब दबडे, (कोल्हापूर) पांडुरंग खिलारे, प्रकाश वायदंडे, बसपचे अमोल महापुरे, फकिराचे नातू श्रीकांत साठे, फकिराचे वारसदार प्रकाश साठे, सरोज साठे, किरण साठे, प्रकाश नाईक, अरुण चव्हाण, बापूराव बडेकर, दीपक मिसाळ, अशोक गायकवाड, अजिंक्य बल्लाळ, प्रकाश वायदंडे, प्रकाश नाईक यांच्यासह महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

चौकट

खर्डा-भाकर चळवळीचे प्रतीक!

अनेक वर्षांपासून ओसाड आणि उजाड व दुर्लक्षित असलेल्या फकिरा गडाच्या आजूबाजूला माणसांचा वावर दिसत होता. गडावरून उतार झाल्यानंतर पुरुष, महिलांसह लहान मुलांनी खर्डा-भाकरीवर ताव मारला.

Web Title: The world saw the revolutionary nature of Fakira through the writings of Anna Bhau