कामचुकार ठेकेदार रडारवर
By Admin | Updated: November 13, 2014 23:50 IST2014-11-13T23:48:29+5:302014-11-13T23:50:05+5:30
जिल्हा परिषद : जल व्यवस्थापन समिती सभेत ठराव

कामचुकार ठेकेदार रडारवर
सांगली : जिल्ह्यात नळपाणी पुरवठा योजनेची ४८ कामे अद्याप अपूर्णावस्थेत असून, कामात कुचराई करणाऱ्या संबंधित ठेकेदारांना कोणतीही नवीन कामे न देण्याचा ठराव आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापन समितीच्या सभेत घेण्यात आला. त्याचप्रमाणे बहे ( ता. वाळवा) येथील १ कोटी ९८ लाखांच्या नळपाणी पुरवठा योजनांच्या कामास मंजुरी देण्यात आली.
जल व्यवस्थापन समिती सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर होत्या. यावेळी उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, सभापती गजानन कोठावळे, पपाली कचरे, उज्ज्वला लांडगे आदींसह समितीचे सदस्य व अधिकारी उपस्थित होते. छोटे पाटबंधारे विभागाकडून जिल्ह्यात पाझर तलाव आणि सिमेंट बंधाऱ्यांची निर्मिती केली जाते. सध्या त्यांच्याकडे सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आहे. परंतु हा निधी कमी पडत असल्याची बाब समितीसमोर आली. छोटे पाटबंधारे विभागाकडून ४६ कामे सुरु असून, नवीन १३ कामांना काही महिन्यांपूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे.
या सर्व कामांसाठी ७ कोटी ८९ लाखांच्या निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीकडून या कामांसाठी अजून २ कोटी रुपयांचा निधी वाढवून मिळावा, असा ठराव करण्यात आला.
छोटे पाटबंधारे विभागाचे नऊ अभियंता सध्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनेकडे कार्यरत आहेत. परंतु कामाचा वाढता आवाका लक्षात घेऊन, संबंधित नऊ अभियंत्यांना पुन्हा छोटे पाटबंधारे विभागाकडेच वर्ग करावे, अशीही मागणी करण्यात आली. सभेत लेंगरे (ता. खानापूर) येथील ३६ लाख रुपयांच्या सिमेंट बंधाऱ्याच्या कामास मंजुरी देण्यात आली. यावेळी रोजगार हमी योजनेची माहिती गावा-गावात पोहोचवून जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्षा होर्तीकर यांनी अधिकाऱ्यांना दिले. (प्रतिनिधी)