साडेतीन कोटींची कामे ऐनवेळी घुसडली

By Admin | Updated: September 11, 2015 00:54 IST2015-09-11T00:48:53+5:302015-09-11T00:54:51+5:30

स्थायी समिती : शेवटच्या सभेत सत्ताधाऱ्यांचा गोलमाल

The works of about three and a half million enters intro | साडेतीन कोटींची कामे ऐनवेळी घुसडली

साडेतीन कोटींची कामे ऐनवेळी घुसडली

सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभेत सत्ताधारी काँग्रेसने ऐनवेळी साडेतीन कोटींची कामे घुसडली आहेत. या कामाबाबत सत्ताधारी नगरसेवकही अनभिज्ञ आहेत. स्थायी समितीच्या शेवटच्या सभेत हा सारा गोलमाल करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील सभेत इतिवृत्त मंजुरीवेळी या ठरावाला विरोध होण्याची शक्यता आहे.
स्थायी समितीचे सभापती संजय मेंढे यांच्यासह आठ सदस्य ३१ आॅगस्ट रोजी निवृत्त झाले. याचदिवशी मावळत्या स्थायी समितीची शेवटची सभा झाली. या सभेत ऐनवेळच्या विषयात क्रमांक १२२ ते १३१ पर्यंतचे ठराव घुसडण्यात आले आहेत. या विषयांची सभेत कोणतीही चर्चा झालेली नाही. खुद्द सत्ताधारी गटाच्या अनेक सदस्यांना या ठरावाची साधी माहितीही नाही. आता या ठरावाची माहिती उजेडात आल्यानंतर अनेकांना धक्का बसला. यातील बहुतांश कामे विनानिविदा देण्यात आली आहेत.
या ठरावात मिरज कृष्णाघाट स्मशानभूमी दुरुस्ती, रंगकाम व बुद्ध विहारसमोरील जागेत शेड बांधण्याची दहा लाखांची निविदा प्रतिसाद मिळाला नसल्याचे कारण देत दोन ठेकेदारांना देण्यात आली आहे. मिरजेतील प्रभाग २८ मधील पंचशील चौकातील रस्त्यावर खड्डे पडल्याने काँक्रिटीकरणाचे साडेतीन लाखाचे काम विनानिविदा देण्यात आले आहेत. या प्रभागातील वेताळनगरमधील आरसीसी गटार बांधण्याचे ५ लाख ८१ हजाराचे कामही ऐनवेळी मंजूर करण्यात आले. अर्थसंकल्पात प्रस्तावित या कामाला ठेकेदार अल्पप्रतिसाद देतील आणि जाहीर निविदेवरील खर्च वाचविण्याचे कारण पुढे करीत या कामाला विनानिविदा मान्यता दिली आहे. प्रभाग चारमधील माधव सोसायटीतील हॉटमिक्स रस्ता व बालाजीनगरमधील डांबरीकरणाचे प्रत्येकी पाच लाखाचे काम, प्रभाग २८ मधील कोकणे गल्लीतील अंतर्गत रस्ते सुधारण्याचे ९ लाख ४९ हजार, या प्रभागातील चाँद कॉलनीतील आरसीसी गटारीचे ८ लाख ४२ हजारांचे काम विनानिविदा मंजूर केले आहे.
घनकचऱ्याची कामे वादाच्या भोवऱ्यात
या सभेत घनकचरा व्यवस्थापनांतर्गत समडोळी व बेडग रस्त्यावरील कचरा डेपोमध्ये प्रत्येकी १ कोटी ९ लाख रुपये, असे दोन कोटी १८ लाख रुपये खर्चून अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरणासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या.
ही कामे घनकचऱ्यापोटी विभागीय आयुक्तांकडे जमा केलेल्या २० कोटींतून प्रस्तावित केली आहेत.
विभागीय आयुक्तांनी या कामांना मध्यंतरी मंजुरी
दिली नव्हती. तरीही स्थायी समितीने ही कामे मंजूर केल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
 

Web Title: The works of about three and a half million enters intro

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.