कामचुकार अधिकाऱ्यांची गय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2016 23:30 IST2016-06-17T23:04:56+5:302016-06-17T23:30:59+5:30
सुमनताई पाटील : कवठेमहांकाळला आढावा बैठकीत इशारा

कामचुकार अधिकाऱ्यांची गय नाही
कवठेमहांकाळ : शासनाच्या विविध योजना राबवा. त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळवून द्या. गोरगरीब जनतेच्या कामात हयगय कराल तर याद राखा, कुणाचीही गय करणार नाही. कामचुकार अधिकाऱ्यांना सोडणार नाही, अशा शब्दांत आमदार सुमनताई पाटील यांनी अधिकाऱ्यांना खडसावले.
येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत सुमनताई बोलत होत्या. या बैठकीत नागरिकांनी आरोग्य विभागाचे पोस्टमार्टम करताना भोंगळ कारभाराचे वाभाडे काढले. यावेळी आ. सुमनतार्इंनी प्रशासनाच्या कारभाराचा विभागवार आढावा घेतला. जरी पावसाला सुरुवात झाली असली तरी पाण्याचे स्रोत अजूनही बळकट झाले नाहीत. त्यामुळे आणखी काही दिवस तरी टँकर चालूच ठेवावेत असे आदेश दिले. तिसंगी येथील आरोग्य सेविका हजर नसतात, त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. अग्रण धुळगाव येथील आरोग्य उपकेंद्र दीड वर्षापूर्वी उद्घाटनासाठी उघडले होते. तेंव्हापासून परत एकदा सुद्धा उपकेंद्राचे कुलूप काढले नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. याशिवाय येथील आरोग्य सेविका मनमानी कारभार करीत असल्याने तात्काळ बदली करावी अशी मागणी झाली. याप्रकरणी आयुक्तांकडे अहवाल पाठविला असल्याचे माजी आरोग्य आणि बांधकाम सभापती गजानन कोठावळे यांनी सांगितले. ढालगावचे उपकेंद्रातील कर्मचारी अरेरावीची भाषा वापरत आहेत. आ. सुमनताईनी यामध्ये लक्ष घालून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सरपंच सुभाष खांडेकर यांनी केली. या विषयावर आरोग्य आणि बांधकाम सभापती भाऊसाहेब पाटील यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांना चांगलेच धारेवर धरले. आ. सुमनताई पाटील यांनीही तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांची कानउघाडणी केली. जनतेच्या आरोग्याची काळजी घ्या. याशिवाय कृषी विभाग, जलयुक्त शिवार अभियान यासंदर्भातील कामांचा आढावा घेतला.
स्वागत गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके यांनी केले. तहसीलदार सचिन डोंगरे यांनी टँकरची माहिती दिली. विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर गुरव यांनी आभार मानले. यावेळी सभापती भाऊसाहेब पाटील, गजानन कोठावळे, दत्ताजीराव पाटील, उपसभापती जगन्नाथ कोळेकर, मेघाताई झांबरे, उषाताई माने, कल्पना पाटील, जालिंदर देसाई, गणेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)