शेतकरी-मजुरांमध्ये इस्लामपुरात संघर्ष

By Admin | Updated: December 2, 2014 00:12 IST2014-12-01T23:34:55+5:302014-12-02T00:12:20+5:30

दर, वेळापत्रक वादात : बड्या शेतकऱ्यांवर अरेरावीचा आरोप

Workers-laborers struggle in Islampura | शेतकरी-मजुरांमध्ये इस्लामपुरात संघर्ष

शेतकरी-मजुरांमध्ये इस्लामपुरात संघर्ष

इस्लामपूर : उरुण-इस्लामपूर परिसरातील धनदांडग्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नियमबाह्य शेतकामगारांची वेळ व दरपत्रक ठरविले आहे. पण हे कामगारांना मान्य नाही. त्यामुळे शेतकरी व कामगार वर्गात संघर्ष उफाळला आहे.
आज सकाळी ८ नंतर शेतात कामास जाणाऱ्या कामगारांना शेतकऱ्यांनीच अडवले. त्यामुळे कामगार वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. यातील काही महिला कामगारांनी माजी नगरसेवक शिवाजी पवार यांच्याकडे धाव घेत आपले गाऱ्हाणे मांडले. परंतु तेही शेतकरी असल्याने त्यांनाही कामगारांची दखल घेता आली नाही.
उरुण परिसरातील काही धनदांडग्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतात काम करणाऱ्यांचे दर व वेळ निश्चित करण्यासाठी संभूआप्पा मठात शनिवार, दि. १९ रोजी बैठक घेतली. या बैठकीत कामगारांना वेळेचे व दराचे बंधन असणारे पत्रकही वाटण्यात आले. या पत्रकावर कोणाचेही नाव अथवा स्वाक्षरी नाही.
जर शेतकऱ्यांनी हे नियम डावलून जादा पैसे देऊन कामगारांना शेतात नेले, तर संबंधित शेतकऱ्याला ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. दरम्यान, या दराला व वेळेला कामगारांकडून विरोध होत आहे. यामुळेच शेतकरी आणि कामगारांमध्ये संघर्ष उफाळला आहे.
वारणा-कृष्णा खोऱ्यात वसलेल्या शेतात काम करण्यासाठी कामगारांची मोठी टंचाई भासत आहे. त्यातच ऊसतोडही मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी कामगार मिळणे अवघड होत चालले आहे. याचाच फायदा कामगार उठवत आहेत. धनदांडगे शेतकरी एकमेकांचे कामगार जादा पैसे देऊन पळवतात. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. त्यामुळेच की काय, शेतकऱ्यांनीच बेकायदेशीरपणे संघटना स्थापन करुन कामगारांना वेठीस धरण्याचे धोरण अवलंबले आहे. (प्रतिनिधी)


स्वाक्षरीविना असलेल्या पत्रकातील नियम व दर
नवीन पत्रकानुसार कामगारांनी बरोबर ८ वाजता शेतात काम करण्यास हजर राहणे, ही महत्त्वाची अट आहे.
महिलांसाठी एक पारकी सकाळी ७ ते २ पर्यंत १२५ रुपये, ८ ते ५ पर्यंत १५0 रुपये, तर पुरुषांना २00 रुपये, उसाची लागण करण्यासाठी एकरी ३५00 रुपये, सरीची वाकुरी (साखळी) एकरी १५00 रुपये, टोकणी १२00 रुपये, औषध मारणे २५ रुपये पंप, पानस्थळ सोयाबीन काढणी व मळणी २ हजार, कोरडवाहू १८00 रुपये, शाळू उपटून काढणे एकरी १८ पायली, शाळू कापून काढणे एकरी १५ पायली, गहू काढणी-मळणी एकरी १८ पायली, कडबा बांधणी शेकडा १५0 रुपये, उसाचा पाला काढणे एकरी ३५00 रुपये, खोडवा थासणे एकरी १५00 रुपये, पारीने लागवड घालणे एकरी १५00, हरभरा काढून मळून देणे- एकरी १0 पायली असे दर ठरविण्यात आले आहेत.

Web Title: Workers-laborers struggle in Islampura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.