संभाव्य उमेदवारांबाबत कार्यकर्त्यांचा गोेंधळ

By Admin | Updated: September 7, 2014 23:26 IST2014-09-07T21:54:43+5:302014-09-07T23:26:12+5:30

नेत्यांची तयारी : कोणाच्या मागे जायचे, याबाबत संभ्रम

Workers' attention about possible candidates | संभाव्य उमेदवारांबाबत कार्यकर्त्यांचा गोेंधळ

संभाव्य उमेदवारांबाबत कार्यकर्त्यांचा गोेंधळ

सांगली : आघाडी व महायुतीच्या जागावाटपाचा गोंधळ अजून संपलेला नसल्याने यातील घटकपक्षांच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ वाढला आहे. पक्षीय पातळीवरून कार्यकर्त्यांना ‘कामाला लागा’, असे आदेश मिळाले असले तरी, अधिकृत उमेदवार कोण, याबाबतच निर्णय न झाल्याने कार्यकर्त्यांनी कोणत्या आधारावर कामाला लागायचे?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आघाडीच्या जागावाटपाचा निर्णय लटकल्याने कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयांमध्ये सध्या शांतता आहे. कार्यालयातील प्रमुखांना आता पक्षीय आदेशाची प्रतीक्षा लागली आहे. नेते व इच्छुकांचे लक्षही या आदेशाकडे लागले असले, तरी कार्यकर्त्यांची संभ्रमावस्था वाढली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जागावाटपाची चर्चा सुरू आहे. कॉँग्रेस व राष्ट्रवादीने इच्छुकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम पूर्ण केला आहे. मुलाखतींचा कार्यक्रम होऊन आता आठवडा झाला, तरी पक्षाकडून कोणतेही आदेश आले नाहीत. कॉँग्रेसने गत महिन्यात घेतलेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेत, पण आघाडीअभावी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. इच्छुकांनीही आता निवडणुकीची तयारी केली असली तरी, अधिकृत उमेदवार कोण, हेच समजत नसल्याने कार्यकर्ते गोंधळले आहेत. राष्ट्रवादीच्या मेळाव्यातही कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले. ज्यांनी मुलाखती दिल्या त्या इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. प्रत्येकजण आपल्यालाच तिकीट मिळणार, असा दावा करून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकाच पक्षात, एकाच मतदारसंघासाठी अनेक इच्छुक असल्याने, कोणाच्या प्रचाराची तयारी करायची, याचे कोडे कार्यकर्त्यांना उलगडलेले नाही.
राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये सर्वाधिक गोंधळ आहे. त्यांना जिल्ह्यातील कोणत्या जागा वाट्याला येणार, याची कल्पना नाही. त्याशिवाय पक्षातील अनेक नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. काहींनी दोन्ही डगरीवर पाय ठेवल्याने अधिक गोंधळ झाला आहे. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचा अपवाद वगळता अन्य सर्व मतदारसंघात राष्ट्रवादी कार्यकर्ते गोंधळलेल्या स्थितीत आहेत. नेत्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
कॉँग्रेस व राष्ट्रवादीप्रमाणेच महायुतीतही अशीच अवस्था आहे. भाजप व शिवसेनेला जागांबाबतची पुसटशीही कल्पना नसल्याने पक्षीय पातळीवर वातावरण थंड आहे. ज्या जागा भाजपच्या हक्काच्या आहेत, त्याठिकाणच्या उमेदवारीबाबतही आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. सांगलीची जागा भाजपची असली तरी, तिकीट कोणाला मिळणार, यावरून वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे. (प्रतिनिधी)
ज्या ठिकाणी नेते पक्ष सोडतील, त्या ठिकाणी पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याला तिकीट दिले जाईल, अशी घोषणा गृहमंत्री आर. आर पाटील यांनी केल्यामुळे जिल्ह्यातील काही मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये नेतेगिरी वाढली आहे. एकसंधपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आता तिकिटाच्या स्वप्नास्तव पळावे लागत आहे. ऐनवेळी जर प्रामाणिक कार्यकर्त्याला तिकीट मिळालेच नाही, तर पुन्हा पक्षाला नाराजीला सामोरे जावे लागणार आहे.

सांगलीत सध्या उमेदवारीच्या दावेदारीवरून भाजपमध्ये तीन गट पडले आहेत. सुधीर गाडगीळ, आ. संभाजी पवार व नीता केळकर या तिन्ही इच्छुकांना मानणारे कार्यकर्ते विभागले गेले आहेत. उमेदवारी निश्चित झाल्यानंतरही ही गटबाजी अशीच जिवंत राहण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
शिवसेनेला काही ठिकाणच्या जागांची खात्री असली तरी, प्रत्यक्षात उमेदवार कोण असणार, याची कल्पना शिवसैनिकांना नाही. त्यामुळे शिवसेना सध्या थंड आहे.

Web Title: Workers' attention about possible candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.