साडेसहा कोटींची कामे ऐनवेळी घुसडली
By Admin | Updated: April 10, 2015 00:25 IST2015-04-09T23:33:50+5:302015-04-10T00:25:21+5:30
दिग्विजय सूर्यवंशी : महापौर कांबळे यांच्याकडून बेकायदा ठराव

साडेसहा कोटींची कामे ऐनवेळी घुसडली
सांगली : स्वत:ला कायदेपंडित म्हणविणाऱ्या महापौर विवेक कांबळे यांनी गत महासभेत साडेसहा कोटींची कामे ऐनवेळी घुसडल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत केला. प्रशासनाने सूचविलेली अनेक कामे महापौरांनी परस्परच बदलली असून, इतिवृत्त मंजुरीपूर्वीच या कामांची अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सुरू असल्याचेही ते म्हणाले. सूर्यवंशी म्हणाले की, महापौर कांबळे महासभेत वारंवार नियमावर बोट ठेवतात. कायद्यानुसारच काम करणार, असे जाहीरपणे सांगतात; पण त्यांच्याकडून बेकायदा व भ्रष्ट कामांना पाठबळ दिले जात आहे. १९ मार्चच्या महासभेत महापौरांनी महासभेला अंधारात ठेवून ऐनवेळी ६ कोटी ३४ लाख रुपयांची कामे घुसडली आहेत. हा निधी १३ व्या वित्त आयोगाकडून पालिकेला प्राप्त झाला होता. प्रशासनाने या निधीतून सूचविलेली कामेही त्यांनी बदलली आहेत. या निधीतून आरोग्य विभासासाठी दीड कोटी, कचरा डेपोअंतर्गत रस्त्यासाठी ५० लाख, पाणीपुरवठ्याच्या थकित बिलासाठी एक कोटी ८० लाख, बांधकामसाठी दीड कोटी, गॅस्ट्रो साथ कामासाठी ३८ लाख व पाणीपुरवठ्यासाठी ६६ लाखांचा निधी वितरण करण्याची शिफारस प्रशासनाने केली होती.
यातील कचरा डेपोअंतर्गत रस्त्यांच्या ५० लाखांचा निधी इतरत्र वर्ग केला आहे. त्याशिवाय गॅस्ट्रोसारख्या साथीच्या कामासाठीचा निधी वळविला आहे. हा सारा निधी रस्ता डांबरीकरण, गणेश तलाव सुशोभिकरणावर खर्च होणार आहे. वस्तुत: गणेश तलावावर आतापर्यंत दहा कोटी खर्च झाले आहेत. वित्त आयोगाच्या १६ कोटींच्या निधीतूनही गणेश तलावासाठी ६० लाखांची तरतूद केली आहे. आता साडेसहा कोटींच्या निधीतून ४० लाखांची तरतूद केली आहे. हे कामही एकाच ठेकेदाराला दिले आहे. महासभेत ऐनवेळी ठराव झाला असून, त्याचे इतिवृत्त अद्याप मंजूर झालेले नाही. तरीही महापौरांकडून या कामाच्या अंमलबजावणीचा ठराव संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला आहे. कायद्याची भाषा करणाऱ्या महापौरांनी बेकायदेशीर कृत्य केल्याचा आरोपही दिग्विजय सूर्यवंशी यांनी केला. (प्रतिनिधी)