नागनाथअण्णांच्या स्मारकाचे काम सुरू
By Admin | Updated: November 11, 2014 23:17 IST2014-11-11T22:50:34+5:302014-11-11T23:17:18+5:30
तीन एकर जागा : शासनाकडून ५ कोटींपैकी ४0 लाखांचा निधी मिळाला

नागनाथअण्णांच्या स्मारकाचे काम सुरू
वाळवा : हुतात्मा साखर कारखान्याच्या साखर शाळेच्या आवारातील तीन एकर जागेत क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या स्मारकाच्या कामास सुरुवात करण्यात आली. या स्मारकस्थळी नागनाथअण्णांच्या स्वातंत्र्यपूर्व लढ्यातील कार्य व स्वातंत्र्यानंतर त्यांनी वाळवा परिसराच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाची माहिती दिली जाणार आहे.
हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्याहस्ते या स्मारकाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपाध्यक्षा वंदना माने, सरपंच गौरव नायकवडी, हुतात्मा बँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी, नीलावती माळी, महादेव कांबळे, कार्यकारी संचालक एन. एल. कापडणीस, हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष भगवान पाटील उपस्थित होते.
स्मारकासाठी शासनाने ५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी ४० लाख रुपये जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. या स्मारकाचे भूमिपूजन २४ मार्च २०१३ रोजी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांच्याहस्ते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत झाले होते. तसेच १५ आॅगस्ट रोजी तत्कालीन पालकमंत्री पतंगराव कदम यांच्याहस्ते कोनशिला अनावरण करण्यात आले. स्मारकाचा आराखडा आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांनी तयार केला असून, स्मारकाचे काम इंजिनिअर वसंत वाजे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
यावेळी नायकवडी म्हणाले की, हुतात्मा समूहाच्यावतीने निधी उभारून नागनाथअण्णांच्या स्मारकाचे काम हाती घेतले जाणार होते. पण घरातील व्यक्तीनेच स्मारक उभारण्यापेक्षा राज्य शासनाने मदतीचा हात पुढे केला. स्मारकाचे काम लवकरच पूर्ण केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
माजी उपाध्यक्ष दिनकर बाबर, शिवाजी सापकर, सदाशिव जाधव, बी. आर. थोरात, राजेंद्र साळुंखे, विश्वास थोरात, अशोक माने, भगवान पाटील यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)