कोरोना नियंत्रणासाठी मिशन मोडवर काम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:27 IST2021-04-02T04:27:38+5:302021-04-02T04:27:38+5:30
सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांवर उपचाराचे नियोजन आवश्यक आहे. खासगी रुग्णालयासाठीही पर्यवेक्षीय व ...

कोरोना नियंत्रणासाठी मिशन मोडवर काम करा
सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांवर उपचाराचे नियोजन आवश्यक आहे. खासगी रुग्णालयासाठीही पर्यवेक्षीय व प्रशासकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर तातडीने कार्यान्वित करण्यात आली आहेत. एप्रिलमध्ये संपूर्ण महिना सुट्टीच्या दिवशीही कोरोना लसीकरण सुरू राहणार आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने पुन्हा एकदा मिशन मोडवर यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, आयुक्त नितीन कापडणीस, अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, उपजिल्हाधिकारी विजया यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, कोरोना प्रादुर्भावामुळे उपचारासाठी आता खासगी रुग्णालये अधिग्रहित केली आहेत. रुग्णांची संख्या वाढल्यास बेड्सची संख्या कमी पडू नये यासाठी समन्वय आवश्यक आहे.
हॉस्पिटलच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लँट उभे करण्यात आले आहेत. या ठिकाणी पुरवठा आवश्यकतेनुसार व सोयीनुसार उपलब्ध करून घेण्याचे नियोजन करावे. एकाच ठिकाणी शहरी भागात पाच व ग्रामीण भागात १० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळल्यास त्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन तयार करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या.