शिक्षकांनी नाकारले प्रगणकाचे काम
By Admin | Updated: October 7, 2015 00:01 IST2015-10-06T22:32:40+5:302015-10-07T00:01:32+5:30
तहसीलदारांना निवेदन : तासगाव तालुक्यातील १३४ शिक्षक

शिक्षकांनी नाकारले प्रगणकाचे काम
तासगाव : राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावतीकरणाचे काम करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून शिक्षकांची प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या १३४ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र यापूर्वीच शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामाचे ओझे जास्त असल्यामुळे शिक्षकांनी प्रगणकाचे काम नाकारले आहे. याबाबतचे निवेदन मंगळवारी तहसीलदारांना देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून राष्ट्रीय नोंदवही अद्ययावतीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. तालुक्यातील १३४ शिक्षकांना याबाबत आदेश देण्यात आले आहेत. मात्र शिक्षकांकडे सद्यस्थितीत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम, शिक्षण हक्क अधिनियम, सरल माहिती अद्ययावतीकरण, शिक्षणाधिकाऱ्यांचे साडेनऊ ते साडेपाच वाजेपर्यंत शालेय कामकाज करण्याचे आदेश आहेत. तासगाव तालुका प्रज्ञाशोध परीक्षा, नवोदय परीक्षा, जिल्हा परिषदेची शिष्यवृत्ती परीक्षा, तसेच जादा तासांचे काम आहे. परीक्षांचाही कालावधी आहे. त्यामुळे शिक्षकांना हे काम करणे शक्य नसल्याने, प्रगणकाचे काम नाकारत असल्याचे निवेदन नियुक्ती केलेल्या शिक्षकांकडून तहसीलदारांना देण्यात आले.
यावेळी शब्बीर तांबोळी, शिवाजी पवार, रघुनाथ थोरात, प्रवीण जाधव, संजय शिंंदे, अण्णासाहेब गायकवाड, प्रभाकर माने, दगडू जाधव, मच्छिंद्रनाथ कांबळे यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार : गुरव
यावेळी शिक्षक संघाचे पदाधिकारी अविनाश गुरव म्हणाले, शिक्षकांना नैसर्गिक आपत्ती, जनगणना, मतदान याव्यतिरिक्त अन्य कोणतेही शालाबाह्य काम देऊ नये, असे शासनाचे आदेश आहेत. यापूर्वीच तालुक्यातील तीनशेहून अधिक शिक्षकांची मतदान पुनरिक्षण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रगणक म्हणून शिक्षकांची नेमणूक करणे अन्यायकारक ठरणार आहे. याबाबत बुधवारी शिक्षण सभापती, शिक्षणाधिकाऱ्यांना आमची भूमिका सांगितली आहे. मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.