कोरोना कालावधीत फॅमिली डॉक्टरचे काम महत्त्वाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:27 IST2021-05-09T04:27:48+5:302021-05-09T04:27:48+5:30
सांगली : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना बाधितांवर योग्य उपचारासाठी फॅमिली डॉक्टर अर्थात जनरल प्रॅक्टिशनर्स कार्यरत आहेत. संसर्ग झाल्यानंतर तातडीने ...

कोरोना कालावधीत फॅमिली डॉक्टरचे काम महत्त्वाचे
सांगली : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना बाधितांवर योग्य उपचारासाठी फॅमिली डॉक्टर अर्थात जनरल प्रॅक्टिशनर्स कार्यरत आहेत. संसर्ग झाल्यानंतर तातडीने त्याचे निदान होणे आवश्यक असून त्यासाठी या डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची आहे. प्राथमिक लक्षणे असलेले रुग्ण याच डॉक्टरांकडे उपचारासाठी जात असल्याने लवकरात लवकर निदानासाठी प्राधान्य द्यावे, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या पुढाकाराने जनरल मेडिकल प्रॅक्टीशनर्स फोरमच्या डॉक्टरांसाठी वैद्यकीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यात जिल्हा टास्क फोर्समधील डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.
ताप, सर्दी, थकवा, खोकला अशी प्राथमिक लक्षणे असणारे कोरोना रुग्ण फॅमिली डॉक्टरकडे जातात. तिथेच त्यांच्या आजाराचे योग्य निदान होऊन पुढील उपचाराची दिशा ठरत असते. त्यामुळे हा उपक्रम राबविण्यात आला.
डॉ. प्रिया प्रभू देशपांडे म्हणाल्या, कोरोनाचे लवकर निदान होण्यासाठी लवकरात लवकर नमुन्यांची तपासणी करून घ्यावी. लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी तात्काळ स्वतःला कुटुंबातील अन्य सदस्यांपासून विलग केले पाहिजे व लगेच कोविड चाचणी/ तपासणी करून घेतली पाहिजे.
डॉ.आनंद मालाणी यांनी लवकर निदान, लगेच उपचार यामुळे आपण यावर नक्कीच मात करू शकू व पर्यायाने संसर्ग पसरवण्यापासून थांबविण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. अविनाश झळके, डॉ. सोमनाथ मगदूम यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी जनरल मेडिकल प्रॅक्टीशनर्स फोरमचे अध्यक्ष डॉ. अरुण कोळी, सचिव डॉ. अनिता पागे, निमा सांगलीचे अध्यक्ष डॉ. देवपाल बरगाले ,सचिव डॉ. अभिषेक दिवाण यांच्यासह डॉक्टर सहभागी झाले होते.