काँग्रेसच्या माध्यमाने सामान्यांसाठी काम करा

By Admin | Updated: June 15, 2016 00:03 IST2016-06-14T23:01:45+5:302016-06-15T00:03:17+5:30

मोहनराव कदम : जतमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात

Work for the common man through the Congress | काँग्रेसच्या माध्यमाने सामान्यांसाठी काम करा

काँग्रेसच्या माध्यमाने सामान्यांसाठी काम करा

जत : ग्रामीण भागातील व तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी कॉँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करावे, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी मंगळवारी केले. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने श्रीमंत विजयसिंह डफळे दुय्यम बाजार आवार परिसरात जत तालुक्यातील प्रमुख कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा कदम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काय झाले होते, याची चर्चा कार्यकर्त्यांनी करत बसू नये. जिल्हा परिषद व पंचायत समिती कॉँग्रेस पक्षाच्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी आपापसातील मतभेद विसरून एकत्रित काम करावे. पक्षाचे पदाधिकारी प्रत्येक गावात पोहोचणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावे, असेही कदम यांनी यावेळी सांगितले.
माजी मंत्री प्रतीक पाटील यावेळी म्हणाले की, जत तालुक्यातील कॉँग्रेसची ताकद असताना येथे इतर पक्षाचा आमदार निवडून येत आहे, याचे आत्मचिंतन कार्यकर्त्यांनी करणे आवश्यक आहे. तालुका पातळीवर असलेले मतभेद पी. एम. पाटील यांनी येथेच मिटवावेत. ते आमच्यापर्यंत आणू नयेत. माजी आमदार उमाजी सनमडीकर यांनी सर्वांना सांभाळून घेऊन पंधरा वर्षे आमदारकी केली. त्यानंतर तशी परिस्थिती राहिली नाही.
तालुकाध्यक्ष पी. एम. पाटील यांनी स्वागत केले. आनंदराव मोहिते, सत्यजित देशमुख, मालन मोहिते, इंद्रजित साळुंखे, अजित ढोले, सुभाष खोत, माजी आमदार हाफीज धत्तुरे यांनी मनोगत व्यक्त केले. शैलजा पाटील, माजी आमदार उमाजी सनमडीकर, जिल्हा बॅँकेचे संचालक विक्रम सावंत, माजी सभापती सुरेश शिंदे, मन्सूर खतिब, मीनाक्षी आक्की, संतोष पाटील, पिराप्पा माळी आदी उपस्थित होते. मोहन माने-पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)


कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
सुभाष खोत यांचे भाषण सुरू झाल्यानंतर सुरेश शिंदे समर्थक मच्छिंद्र वाघमोडे (रेवनाळ) व भगवान खराडे (अंकले) उठून उभे राहिले. ‘तुम्ही भाषण करून वेळ संपली म्हणून निघून जाता. तालुका पातळीवरील कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी द्या. त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर तोडगा काढा,’ अशी मागणी त्यांनी केली असता माजी सरपंच भीमराव मोरे बोलण्यास उभे राहिले. त्यानंतर विक्रम सावंत समर्थक माजी सरपंच रवींद्र सावंत म्हणाले की, पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना बोलण्याची संधी देऊ नका. जिल्हा पातळीवरील वरिष्ठांना मार्गदर्शनासाठी बोलावले आहे. त्यानुसार बैठक घेण्यात यावी, असे त्यांनी सांगितले असता दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीवेळ बाचाबाची झाली. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. प्रतीक पाटील व मोहनराव कदम यांनी कार्यकर्त्यांना शांत केले. त्यानंतर कार्यक्रम पूर्ववत सुरू झाला.

Web Title: Work for the common man through the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.